बुलडाणा, 17 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने उद्या गुरूवार, 18 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून तर 19 सप्टेंबरच्या सकाळी 8 वाजेपर्यंत संपाची घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन बुलढाणा शाखेचे सचिव डॉ. जी. वाय. व्यवहारे यांनी दिली आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद आहे की, इंडियन मेडिकल असोसिएशन, बुलढाणा ब्रांच डॉक्टरांचा संप आहे. या संपामुळे आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. परंतु हा संप डॉक्टरांच्या व्यावसायिक फायद्यासाठी नाही, तर आपल्या रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आहे. आज राज्य शासनाने होमिओपॅथी सीसीएमपीना आधुनिक वैद्यक (ॲलोपॅथी) पद्धतीने उपचार करण्याचा परवाना दिला आहे. हा निर्णय रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण करणारा आहे. एलोपॅथीचे अल्प प्रशिक्षण घेऊन आजारांवर ॲलोपॅथी उपचार करण्याचा अधिकार देणे धोकादायक आहे. “IMA डॉक्टर म्हणून आमचे कर्तव्य फक्त उपचार करणे नाही, तर आपल्या सर्वांच्या आरोग्याचे संरक्षण करणे हेही आहे. म्हणूनच आम्ही 18 सप्टेंबर रोजी संप करून शासनाला जागृत करत आहोत. हा संघर्ष आपल्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी आहे. हा संघर्ष भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित आरोग्यसेवा टिकवण्यासाठी आहे. आपण सर्वांनी आमच्या या आंदोलनाला नैतिक पाठिंबा द्यावा”, असे आवाहन डॉ. जी. वाय. व्यवहारे तसेच आयएमएच्या कार्यकारिणीने केले आहे.