येळगाचे ग्रामविकास अधिकारी सचिन जाधव यांनी ठेवला आदर्श
बुलढाणा, 19 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः मुकी माया त्याची मुकी घालमेल लेकराच्या पायी उभा जल्म ऊधळेल आधाराचा वड जनू वाकलं आभाळ पाचोळाच तेच्या इना जल्म रानोमाळ घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाप रं लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रं… मरावे परि किर्तीरूपी उरावे अशी मराठीत म्हण आहे. जिवंतपणी माणूस समाजाच्या कामी येत असतोच, पण मृत्यूनंतरही तो जिवंत असतो हे देहदानातू दिसून आले आहे. पिढ्यांपिढ्या बाप आपल्या मुलांसाठी साधनसंपत्ती कमवित असतो. त्याचप्रमाणे चांगले संस्कार सुध्दा आपल्या मुलाबाळांवर टाकत असतो. त्यातून चांगली पिढी घडेल हा त्यांचा मुळ हेतू असतो. त्यामुळे ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले‘ या उक्तीला साजेशे असे काम येळगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सचिन जाधव यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाला केले आहे. मुलाच्या वाढदिवसाला देहदानाचा संकल्प करून त्यांनी समाजापुढे नवा अदर्श निर्माण केला आहे. ग्रामविकास अधिकारी सचिन जाधव यांचा मुलगा आगस्त्य याचा काल 18 सप्टेंबर रोजी दुसरा वाढदिवस होता. त्यामुळे सचिन जाधव यांनी देहदानाचा संकल्प केला आहे. त्यांच्या या संकल्पाबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. देहदानाची प्रेरणा सचिन जाधव यांना विनोद इंगळे यांच्याकडून मिळाली आहे. येळगाव ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी म्हणून सचिन जाधव यांची ख्याती आहे. विविध समाजशील उपक्रम ते आपल्या कार्यक्षेत्रात राबवित असतात.



