बुलडाणा, 20 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : नाल्याच्या पुरात वाहून गेलेले खंडाळा मकरध्वज येथील 70 वर्षीय शेतकरी लक्ष्मण रामराव ठेंग यांचा मृतदेह आज सकाळी त्याच नाल्यात पुढे थोड्या अंतरावर मिळून आला आहे. काल, 19 सप्टेंबरच्या संध्याकाळी घरी परतण्याच्या सुमारास सदर शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेला होता. तेव्हापासून प्रशासन आणि गावकरी मंडळी शेतकऱ्याचा शोध घेत होती. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास त्याच नाल्यात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी आणि नातवंडांचा मोठा परिवार आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात पावसाने थैमान घातले आहे. चिखली, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, मेहकर व लोणार हे तर ढगफुटीचे हॉटस्पॉट बनले आहे. नदी नाले ओलांडताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन गुड इव्हिनिंग सिटीकडून करण्यात येत आहे.



