◾देऊळघाट रोडवरील घटना
बुलढाणा, 20 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी): समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाला समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार युवक जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना देऊळघाट मार्गावर शनिवारी रात्री ७:४५ वाजेच्या सुमारास घडली.
रवी रामेश्वर गिरी (२७ वर्ष) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश रामदास दांडगे (२६ वर्ष), भागवत विलास पवार (२६ वर्ष) अशी गंभीर जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. तिघेही दहिद खू. येथील रहिवासी आहेत. काही वैयक्तिक कामानिमित्त शहरात आलेले तिघे जण आपल्या एमएच २८ एएल ३४४६ क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे निघाले होते. दरम्यान, बुलढाणा शहरातील धाड नाका परिसरात वळण घेतल्यानंतर काही अंतरावरच समोरुन येणाऱ्या एमच २१ बीएच ६६९५ क्रमांकाच्या पीकअप वाहनाला त्यांची धडक झाली. सदर वाहनाचा चालक अन्वा येथील जाधव असल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चालविणारा रवी गिरी याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मृतकासह जखमींना सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. यादरम्यान, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, युवानेते मृत्युंजय गायकवाड व पृथ्वीराज गायकवाड, ओमसिंग राजपूत यांनी मदतकार्य केले.



