बुलढाणा, 21 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : बस स्टँडच्या मागील भागात जांभरून रोडवर एकाचा चाकू भोसकून खून झाला. मृतक युवकाचे नाव शुभम रमेश राऊत (वय 27) असून आरोपीचे नाव ऋषी जवरे आहे. हा खून रात्री 10 वाजे दरम्यान राऊत कॉम्प्लेक्स जवळ नाईंटी चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौकात घडली. दोघांमध्ये आधी वाद झाल्याचे समजते. ऋषी जवरे हा गुंड प्रवृत्तीचा असल्याचे समजते. तर शुभम हा बोथरा एमआरआय सेंटर मध्ये कामाला होता. शुभम आणि त्याचा मित्र बॉबी दोघे गावंडे हॉटेलमध्ये जेवत होते. दरम्यान हातात चाकू घेऊन ऋषी त्या ठिकाणी पोहोचला. त्याचे कुणाशी तरी भांडण झालेले होते. ऋषी यावेळी नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शी म्हणतात. तो कुणाला तरी चाकू मारेल, या भीतीने शुभम त्याच्याजवळ गेला. परंतु भानावर नसलेल्या ऋषीने थेट शुभमच्या छातीच्या खूप मारला. शुभमने आणि बॉबीने दोघांनी मिळून याला प्रतिकार केला परंतु शुभम कोसळला. यात बॉबीला सुद्धा पायाला लागलेले आहे. प्रतीकारादरम्यान ऋषीला पण चाकू लागले. शुभमला जिल्हा रुग्णालयात आणले गेले पण तो वाचू शकला नाही. इकडे जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी उसळली होती. शुभमची आई, वडील, भाऊ आणि नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता. पोलीसही पोहोचले होते. मागील महिन्यात 1 ऑगस्ट रोजी चिखली रोडवर सनी जाधवचा चाकू हल्ल्यात खून झाल्याची घटना घडली. दीड महिन्यात बुलढाण्यात हा दुसरा खून झाला आहे. अर्थातच सुसंस्कृत बुलढाणा शहर आता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाटेवर जात आहे का? अशी भीती सुज्ञ नागरिकांमध्ये व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही.



