बुलढाणा, 24 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः पाऊस एवढा पडतोय की, सर्व शेतकर्यांनी याचा धसका घेतलाय… अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात पडणार्या पावसाचा जसा गावकर्यांना कंटाळा आला आहे, तशीच भावना शहरवासियांची आहे, यात शंका नाही. त्यातल्या त्यात प्रसिद्ध वकील अॅड.अमोल काळवाघे यांच्या कुटूंबीयांच्या अंगावर पावसाचं नांव काढलं की काटा उभा राहतो. ढग दाटून आले की, अमोल काळवाघेंच्या काळजात धस्स होतं…आडनावात वाघ असलं तरी अमोलदादा भितात?? स्किजोफ्रेनिया सारखा तर प्रकार नाही?? अशी शंका एखाद्याला येऊ शकते. असला काही प्रकार नाही, हे गुड इव्हिनिंग सिटी स्पष्ट करीत आहे. कारण एवढंच आहे की, पाऊस आला की, त्यांच्या अंगणात तळं सांचतं आणि त्या पाण्यातून जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. अॅड.अमोल काळवाघे यांनी बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्यांनी याबाबत सांगितले आहे की, बुलढाणा शहरातील मुठ्ठे ले आऊट येथील भास्कर नामदेव पारिम यांच्या घरात भाड्याने राहतो. त्या घराच्या समोर नाली असल्यामुळे ती बंद झालेली आहे. कारण घराजवळील लोकांनी त्या नालीवर धाबे टाकले असल्यामुळे ती नाली बंद पडली आहे. त्यामध्ये घाण साचली आहे. पावसाच्या पाण्यामुळे व इतर वेळी ती सर्व घाण अंगणात साचते. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तात्काळ ती नाली मोकळी करावी अशी मागणी अॅड.अमोल काळवाघे यांनी निवेदनाव्दारे केली आहे. या निवेदनावर अॅड.अमोल काळवाघे यांची स्वाक्षरी आहे.