अमोल हिरोळे यांचा पाठपुरावा यशस्वी
बुलढाणा, 27 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः बुध्द विहार गारडगाव ला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्धविहार गारडगाव येथे 22 मे 1978 रोजी बुद्ध पौर्णिमेला तिबेटचे दहावे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्याहस्ते उद्घाटन झालेले आहे. मागील 47 वर्षांपासून या विहाराला शासनाची किंवा आमदार निधी ची कोणतीही मदत वारंवार मागून सुद्धा देण्यात आलेली नव्हती. अमोल हिरोळे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. ही बाब कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे लक्षात येताच त्यांनी त्यांचे व हिरोळे परिवार यांचे घनिष्ठ संबंध जोपासत व आपल्या दिलेल्या शब्दावर कायम राहून त्यांचे विशेष प्रयत्न व पाठपुरवठा करू 26 सप्टेंबर रोजीच्या जिल्हा नियोजन व विकास समितीच्या सभेत राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बुद्ध विहार गारडगावला क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा प्रदान करून विहारा च्या विकास कामांकरिता एक कोटींचा निधी मंजुर करून दिला. या बुध्द विहाराचे अध्यक्ष उद्योजक अमोल हिरोळे तर सचिव डॉ.अर्चित हिरोळे आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बुद्ध विहार गारडगाव येथे ब्रह्मदेशाचे पंतप्रधान उनु, माजी सरसंघसंचालक स्व.बाळासाहेबजी देवरस अशा अनेक मान्यवरांनी या विहारास भेटी दिलेल्या आहेत. तसेच देश विदेशातील व जिल्ह्यातील अनेक प्रतिष्टीत व सर्व सुपरिचित असलेले अनेक मान्यवरांनी या विहाराला भेटी दिलेल्या आहेत. बुद्ध विहार गारडगावला क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा प्रदान करून विहाराच्या विकास कामांकरिता एक कोटींचा निधी मंजुर केल्यामुळे जिल्ह्यतील बौद्ध बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यामुळे लवकरच या बुद्ध विहाराचा कायापालट होईल यात शंका नाही. या करीता किरण पाटील जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच बुलढाणा येथील भारतीय जैन संघटनेचे समन्वयक राजेश देशलहरा यांनी या विहाराला क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळण्याकरिता विशेष परिश्रम घेतले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बौद्ध समाज बांधवांतर्फे आणि विहाराचे अध्यक्ष अमोल हिरोळे व सचिव डॉ.अर्चित अमोल हिरोळे यांच्या तर्फे सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.



