बुलढाणा, 9 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : एक तरुण मेंढपाळ अस्वलाच्या हल्ल्यात जबर जखमी झाला आहे. पळसखेड सपकाळ येथील एका शेतामध्ये आज दुपारी अडीच वाजे दरम्यान सदर घटना घडली. सहस्त्रमुळी येथील रहिवासी शांताराम उमेश आयनर (वय 32) हा मेंढ्या चारण्यासाठी गावोगावी फिरत होता. आज तो पळसखेड सपकाळ शिवारामध्ये मेंढ्या घेऊन गेला. अडीच वाजेच्या दरम्यान त्याच्यावर अचानक अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अस्वलाने शांतारामचे डोके फोडले असून हात आणि काही अंशी गाल सुद्धा फाडला आहे. आरडाओरडा केल्यामुळे तो बचावला त्याला रक्तबंबाळ अवस्थेमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु रक्तस्त्राव अधिक होत असल्याने आणि जखमा खोल असल्याने त्याला तात्काळ पुढील उपचारासाठी दुसरीकडे हलवण्यात आले आहे. शांतारामची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. पळसखेड सपकाळ शिवारामध्ये अस्वल आणि बिबट्या दोघांचेही विचरण करण्याचे प्रमाण वाढले असून या हिंस्त्र प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.



