बुलढाणा, 12 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाण्याच्या अवकाशामध्ये मागील अर्ध्या तासापेक्षा अधिक काळापासून एक विमान सातत्याने घिरट्या घालत आहे. भारत आणि पाकिस्तान मधील युद्ध जरी संपले असले तरी युद्धाचे सावट नेहमी असते. त्यामुळे शत्रू शत्रु राष्ट्राचे तर हे विमान नाही ना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शंका अनेकांच्या मनात निर्माण झाल्या. याबाबत गुड इव्हिनिंग सिटीकडे अनेकांनी संपर्क करून विचारणा केली. जेव्हा गुड इव्हनिंग सिटीने याबाबत जिल्हा पोलीस प्रशासनाशी बोलणी केली, तेव्हा त्यांना याबाबत कुठलीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क केल्यानंतरही काहीच माहिती मिळाली नाही. दरम्यान विमानाच्या दहा ते बारा वेळेस घिरट्या झाल्या होत्या. लोक आपल्या घराच्या छतावर येऊन विमानाकडे कुतूहलाने पाहत होते. लाल रंगाचे असलेले हे विमान आकाराने छोटे आहे आणि प्रवासी विमान वाटत नाही. याबाबत गुड इव्हिनिंग सिटीचा पाठपुरावा सुरूच होता. नंतर माहिती अशी मिळाली की सदर विमान हे नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी काम करीत आहे. नळगंगा नदीपासून बुलढाण्यापर्यंतच्या आसमंतामध्ये हवाई सर्वेक्षण केले जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले की लोकांनी कुठल्याही प्रकारची काळजी करू नये. पॅनिक होऊ नये. सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. त्याचा सुरक्षिततेशी कुठलाही संबंध नाही. असे काही असते तर याबाबत गृहमंत्रालयाकडून आपणास एडवायझरी मिळाले असती. म्हणून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. येणाऱ्या काही दिवसांमध्ये असेच हवाई सर्वेक्षण इतर ठिकाणी होऊ शकते, अशीही माहिती श्री पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी महोदयांची ही माहिती चिंतामुक्त करणारी निश्चितच आहे. त्यामुळे आकाशात सुरू असलेल्या विमानाच्या घिरट्या घाबरलेल्या डोळ्यांनी नव्हे तर कुतूहलाच्या डोळ्यांनी एन्जॉय करा, असे आवाहन गुड इव्हिनिंग सिटी करीत आहे.



