बुलढाणा, 12 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाण्यासारख्या सुसंस्कृत शहरात कुंटनखाणा चालतो, यावर कुणाचा विश्वास बसू शकत नाही. काही ठिकाणी चोरून लपून देह विक्रीचा व्यवसाय केला जातो, हे सत्यही नाकारता येत नाही. पण मागील तीन ते चार महिन्यांपासून एक 42 वर्षीय आंटी चिखली रोड वर कुंटनखाणा चालवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात आणि एलसीबी प्रमुख पिआय श्री अंबुलकर यांच्या सूचनेनुसार एलसीबीच्या पथकाने देहविक्रीचा हा अड्डा उध्वस्त केला. आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ही कारवाई झाली. हाजी मलंग दर्गाहच्या मागे एका घरात या आंटीने देह विक्रीचा अड्डा सूरू केला होता. आज जेव्हा पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी दोन तरुणी सह एका ग्राहकाला पोलिसांनी रंगेहात पकडले. खळबळजनक बाब म्हणजे दोन तरुणी मधील एक तरुणी मध्य प्रदेशची तर दुसरी छत्तीसगडची आहे. 22 वर्षीय आणि 28 वर्षीय या दोन्ही पिडीत तरुणींची आंटीच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. तर आंटी आणि ग्राहकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दिवसेंदिवस या परिसरातील वातावरण बिघडत जात असल्याचा धोका निर्माण झाला होता. सदर परिसरातील वैतागलेल्या काही सुज्ञ नागरिकांनी पोलिसांना याबाबत गुप्त माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ ही कारवाई केली.



