बुलढाणा, 25 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाण्यापासून 15 किलोमीटर अंतरावर राजूर घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम राहेरा येथे आज दोन गट आपसांमध्ये भेटले. दोन्ही गटांनी एकमेकांमध्ये तुंबळ हाणामारी केली असून यात दोन्ही गटाचे एकूण किमान 5 जण जखमी झाले आहेत. तर 6 जणांना किरकोळ मार लागला आहे. यातील कुणीही गंभीर जखमी नाही. दोन कार फोडण्यात आल्या आहेत. यातील एक गाडी जाळण्यात आल्याने बुलढाणा इथून नगर परिषदेचे अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले आहे. धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या राहेऱ्यात एकाच समाजातील दोन गटांमध्ये वाद झाला आहे. गवई आणि जाधव या दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली. पैशाच्या जुन्या व्यवहारातून हा वाद झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान धामणगाव बढे पोलिसांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून दोन्ही गटातील भांडखोरांना ताब्यात घेतले आहे.



