सागावनच्या एकाच घरात राहतात 126 लोक
बुलढाणा, 30 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी समोर आणलेला “वोटचोरीचा” मुद्दा गंभीर असल्याचे शिवसेना उबाठाने अधोरेखित केले असून बुलढाणा विधानसभेत मतदार यादीचा महाघोळ पुराव्यांसह सादर करण्यात आला. शिवसेनेच्या राज्याच्या प्रवक्त्या ॲड.जयश्रीताई शेळके यांनी बुलढाण्यात 7500 पर्यंत दुबार मतदार असल्याचा आरोप केला आहे. तर 5291 मतदार मयत आहेत. मयतच्या नावावर मतदान झाले आहे. तर सागवन मधील एकाच घरात 126 लोक आणि ते सुद्धा विविध जाती धर्माचे राहत असल्याचे मतदार यादी सांगत आहे. असे विविध घोळ मतदार यादीत असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुकापूर्वी मतांचा घोळ थांबवावा आणि बोगस मतदार वगळावे, अशी मागणी जयश्रीताई सह जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, डी. एस. लहाने यांनी केली आहे.
येथील हॉटेल रामा ग्रँडच्या सभागृहात दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत बुलढाणा मतदार संघाच्या मतदार यादी चे पोस्टमार्टम केले. मतदार यादी क्रमांक, पेज क्रमांक तसेच घर क्रमांक सहा त्यांनी मतदार यादीतील घोळ पत्रकारांसमोर उजागर केला. केवळ 841 मतांनी झालेल्या पराभवामागे बोगस मतदार, मयत मतदार तसेच बुध कॅप्चरिंगचा प्रकार असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करतांना जयश्रीताईंनी प्रातिनिधिक स्वरूपात सागवन, सुंदरखेड तसेच मोताळा तालुक्यातील निपाणा गावची मतदार यादी समोर मांडली. निपाणा गावामध्ये एकूण 1126 मतदार आहेत. त्यात 132 मतदार मयत आहेत. तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मयत मतदारांच्या नावावर मतदान झाले. अशीच अवस्था सुंदरखेडच्या मतदार यादीतील क्रमांक 506 मतदाराची आहेत. पंधरा वर्षांपूर्वी मयत झालेल्या मतदाराचे नाव यादीत अजूनही कायम आहे. 2004 मध्ये सरदारसिंग देवसिंग गायकवाड यांचे निधन झाले होते परंतु 21 वर्षानंतर सुद्धा दिवंगत सरदार सिंग मतदार यादीत कायम आहेत. यावेळी जयश्री ताईंनी मागणी केली की प्रशासनाने तात्काळ या संपूर्ण घोळाची दखल घेवून मयत आणि बोगस मतदार हटवावे. ज्यांची नांवे दोन वेळा नांवे आहेत, ती वगळावी, असेही जयश्रीताईंनी म्हटले.
एकाच घरात हिंदु-मुस्लिम-बौद्ध ः डी.एस.लहाने
सागवनमध्येही मतदार यादीत मोठा घोळ असून याठिकाणी एकाच घरात १२६ लोक राहतात, असा खळबळजनक दावा उबाठा नेते डी.एस. लहाने यांनी केला आहे. ‘मतदार यादी क्रमांक २६३ पासून ते २७५ पर्यंत एकुण १२६ मतदार एकाच घरात आहेत. विशेष म्हणजे एक हजार स्न्वेअर फूटच्या छोट्याश्या घरात १२६ लोक राहणे कसे शक्य आहे ? असा सवाल करीत ते पुढे म्हणाले की, मजेशीर गोष्ट म्हणजे हे सर्व १२६ लोक विविध जाती धर्माचे आहेत. यात हिंदु तर आहेतच पण मुस्लिम आणि बौद्धसुद्धा आहेत. घराचा पत्ता नसलेले ३८३५ मतदार या मतदार यादीत असल्याचेही श्री लहाने म्हणाले. सागवनमध्ये राहणार्या मतदाराचे घर बुलढाणा आणि सावरगांव डुकरे कसे काय असू शकते? हा सवाल करतांना त्यांनी मतदार यादीतील घोळ थांबवावा, अशी मागणी केली.
पत्रकार परिषदेला लखन गाडेकर, गजानन उबरहंडे, पुरुषोत्तम हेलगेंसह विविध नेते मंडळी उपस्थित होते.



