बुलढाणा, १ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नांवर नागपूर येथे मोठे आंदोलन केले होते. एका महिलेने त्यांच्या हाताला पदर फाडून बांधला आणि सांगितले की, कर्जमाफी झाल्याशिवाय मागे हटू नका पण सरकार सोबत झालेल्या चर्चेनंतर ८ महिने शेतकरी कर्जमाफीसाठी थांबावे लागणार असल्यामुळे त्या आंदोलनावर सोशल मिडीयावर टीका होत आहे. कर्जमाफीच्या चर्चेसाठी गेलेल्या शेतकरी नेत्यांच्या बॅग वरून ते ट्रोल होत आहे.
नागपूर हायकोर्टाच्या आदेशानंतर बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन स्थळाची जागा खाली करून रस्ता मोकळा करण्याचे आदेश देण्यात आले. राज्यसरकारकडून राज्यमंत्री पंकज भोयर, आशिष जैस्वाल यांच्या शिष्टमंडळाने बच्चू कडू व संबधीत नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी चर्चेसाठी शेतकरी नेत्यांना मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात बोलविण्यात आले होते. त्या दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर, राजू शेट्टी, महादेवराव जानकर, अजित नवले हे बॅगा घेऊन वर गेले होते. राज्यसरकारकडून शेतकरी कर्जमाफीबाबत समिती स्थापन करून ३० जून नंतर कर्जमाफी केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी नेत्यांविरोधात सोशलमिडीयावर विविध चर्चा रंगल्या आहे. त्यामध्ये त्यांच्या बॅग घेऊन जातांनाच्या व्हिडीओ वरून टीकेची झोड उठली आहे. या संबधीत गुड इव्हिनिंग सिटीने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया घेतली.
आम्ही बॅगेत कपडे नेऊ नाही का ? : रविकांत तुपकर
सह्याद्री अतिथीगृहात जाण्यासाठी आम्हाला दोन गाड्या देण्यात आल्या होत्या. त्या खाजगी गाड्या होत्या त्यामुळे आम्ही आमच्या कपड्याच्या बॅग त्या गाड्यात ठेवल्या नाही. आम्हाला बैठकीसाठी रात्री उशीर होणार होता त्यामुळे आम्ही आमचे कपडे सोबत नेले होते. आम्ही आमच्या कपड्यांच्या बॅग घेऊन सह्याद्री अतिथीगृहात गेलो. आम्ही आमच्या बॅगेत कपडे नेऊ नाही का ? सह्याद्री अतिथीगृहात आम्हाला फ्रेश होण्यासाठी दोन रूम देण्यात आल्या होत्या.



