कार्यकारी अभियंता रोहन पाटील गजाआड
बुलढाणा, ४ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : एका शासकीय कंत्राटदाराला ४१ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागात कार्यरत कार्यकारी अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी अटक केली. रोहन चंद्रशेखर पाटील (३५) रा. साईनगर, अमरावती असे अटक करण्यात आलेल्या कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून त्यांना कार्यकारी अभियंता रोहण पाटील यांच्याकडून बुलढाणा जिल्ह्यातील इलेक्ट्रिकलचे काम मिळाले होते. सदर कामाचे अंदाजपत्रक क्रमांक ९८५, १३०४, १५८ असे आहे. त्याबाबत तक्रारदार कंत्राटदार हे कार्यकारी अभियंता रोहन पाटील यांना भेटण्याकरिता गेले. त्यावेळी रोहण पाटील यांनी तक्रारदार कंत्राटदार यांना सदर तिन्ही कामे ही एकूण १७ लाख ९४ हजार रुपयांची होतात. तुम्ही मला २ टक्के प्रमाणे ३५ हजार रुपये द्या. तसेच तुम्ही बुलढाणा येथील जुन्या शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाच्या अंदाजपत्रक क्रमांक ९८६ ची वर्कऑर्डरसुद्धा घेऊन जा, असे म्हटले. त्यावर तक्रारदार कंत्राटदार यांनी रोहण पाटील हे मागील झालेल्या तीन कामांच्या १७ लाख ९४ हजार रुपये एवढ्या रकमेच्या २ टक्के म्हणजे ३५ हजार रुपयांची लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीच्या अनुषंगाने ४ सप्टेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात रोहण पाटील यांनी तक्रारदार कंत्राटदार यांना तीन कामांचे २ टक्के प्रमाणे ३५ हजार रुपये व वर्कऑर्डरचे ६ हजार रुपये अशी एकूण ४१ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रोहन पाटील यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुनील किनगे व मंगेश मोहोड, युवराज राठोड, वैभव जायले, गोवर्धन नाईक यांनी केली.