बुलढाणा, 5 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : नगरपालिका निवडणुकांची घोषणा झाली… आचारसंहिताही लागली परंतु अजूनही काही मस्तीखोरांच्या डोक्यात ही बाब शिरलेली दिसत नाही. सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाची पर्वा न करता भर रस्त्यावर, गजबजलेल्या कारंजा चौकात वाढदिवस साजरा करणे आणि वरून फटाक्यांची मस्ती करणे काही तरुणांना चांगलेच महागात पडणार आहे. कारण हा सर्व प्रकार जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला. पुढील काही मिनिटातच पोलिसांचा मोठा फौज फाटा कारंजा चौकात दाखल झाला आणि त्यानंतर मात्र उपस्थित टोळक्याची चांगलीच भंबेरी उडाली.
स्वतः एसपी तांबे यांनी चौकात उभं राहून चौक शिस्तीत आणला. वाढदिवसाच्या फटाक्यांमुळे कारंजा चौकात पोलिसांनी शिस्तीचे फटाके फोडले. अनेक बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यात आली. तब्बल दीड तासापर्यंत कारंजा चौकामध्ये कारवाईचे फवारे उडत होते. एसपी निलेश तांबे यांनी यंत्रणेकडून रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग रेषा आखून घेतली. नंतरच ते निघून गेले. गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार वाढदिवसाच्या या मस्तीबाज इव्हेंटच्या सूत्रधारांना पोलिसांकडून ताब्यात घेतली जाणार आहे. यापैकी चार जणांची पोलिसांकडे माहिती सुद्धा आली आहे
पोलीस अधीक्षकांच्या बंगल्याची डागडुजी सुरू असल्यामुळे एस पी निलेश तांबे सध्या पोलीस मुख्यालयातील शासकीय निवासस्थानामध्ये राहत आहेत. कार्यालयातून घरी जाताना येताना त्यांना कारंजा चौक मध्ये पडतो. सदर चौकात सतत गर्दी असते. वाहतुकीची शिस्त नाही की, पार्किंगची व्यवस्था नाही, यामुळे क्षणोक्षणी वाहतुकीची कोंडी होते. ही बाब नवीन एसपींच्या नजरेतून सुटली नाही. आज संध्याकाळी 8 वाजेदरम्यान ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत घरी जात असताना त्यांना कारंजा चौकात वाढदिवसाचा हा बेलगाम एन्जॉयमेंट दिसून आला. भर रस्त्यावर फटाक्यांची लडी लावण्यात आली होती. दुसरीकडे वाहतुकीचा कोंडमारा झाला होता. हे सर्व असह्य होऊन एसपी तांबे यांनी मस्तीखोर तरुणांना हटकले परंतु एसपी नवीन असल्यामुळे आणि सिव्हिल ड्रेस मध्ये असल्यामुळे त्यांना कुणी ओळखले नाही, असे कळते. नंतर एसपींनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले आणि पुढील कारवाई केली. एसपी तांबे आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय वेळोवेळी देत आहेत. बुलढाणा जिल्हा नशा मुक्त करण्यासाठी त्यांनी मिशन परिवर्तनला मोठ्या प्रमाणावर चालना दिली आहे. गुंडागर्दीचा आलेख वाढलेल्या बुलढाणा शहराला वळणावर आणण्यासाठी एसपी निलेश तांबे यांच्या प्रयत्नांना सुज्ञ बुलढाणेकरांनी बळ देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.



