बुलढाणा, 14 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : नगर परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीसाठी केवळ दोन दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे युती-महायुती, आघाडी-महाविकास आघाडीच्या घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. येणाऱ्या दोन दिवसांमध्ये अनेक धक्कादायक घडामोडी घडतील, यात शंका नाही. यासाठी जनतेने तयार राहणे आवश्यक आहे. बुलढाणा नगरीमध्ये शिवसेना आणि भाजपची युती होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट आहे. महायुतीचा पोपट मेल्यागत जमा आहे. परंतु या सर्व स्थित्यंतरामध्ये महायुती मधील तिसरा घटक असलेला राष्ट्रवादी अजित दादा पवार गट चांगलाच फॉर्ममध्ये आहे. अजितदादा गटाचे भाव चांगलेच वधारले असून त्यांना सोबत घेण्यासाठी भाजपकडून मनधरणी तर शिवसेनेकडून त्यांची खुशामत सुरू आहे. राष्ट्रवादीकडून भाजपकडे 12 पेक्षा अधिक जागांची मागणी करण्यात आली आहे. परंतु इतक्या जागा देणे शक्य नसल्याचे भाजपकडून अजितदादा गटाला कळविण्यात आल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादी थोडी नाराजी आहे. ही नाराजी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी हेरली आहे. त्यांनी आज संध्याकाळी तातडीने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या मातोश्री जनसंपर्क कार्यालयावर बोलावून घेतले. या ठिकाणी राष्ट्रवादी अजित दादा पवार गटासोबत शिवसेना शिंदे गटाच्या युतीबाबत प्राथमिक चर्चा झाली. सदर बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, एकमेव आमदार मनोज कायंदे यासारखे नेते नव्हते. परंतु चर्चेत सहभागी पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांना विचारूनच बैठकीमध्ये सहभागी झाले होते. अर्थात सदर बैठकीमध्ये कुठलाही स्पष्ट निर्णय झाला नाही पण युतीच्या दिशेने चर्चा सकारात्मक राहिली असल्याचे समजते. दोन्ही पक्षांमध्ये कुठल्या बाबींवर तडजोडी होतील, हे सांगता येणार नाही पण सदर बाब भाजपला अस्वस्थ नक्कीच करेल, यात शंका नाही. आमदार संजय गायकवाड यांनी अजितदादा गटाकडे काय प्रस्ताव दिला किंवा राष्ट्रवादीने काय डिमांड (जागांबाबत) ठेवली?, हे मात्र कळू शकले नाही.



