भाजपने दाखविला विजयराज शिंदेंवर विश्वास ! सौ. अर्पिताताईंना नगराध्यक्षपदाची उमेदवारी
बुलढाणा, 17 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः शिवसेना शिंदे गटाकडून सौ. पूजाताई संजय गायकवाड यांचा अर्ज दाखल झाला आहे. त्यानंतर काही वेळातच भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आणि आ. गायकवाड यांचे परंपरागत राजकीय शत्रु विजयराज शिंंदे यांच्या पत्नी सौ. अर्पिताताई शिंदे यांनी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरतेवेळी भाजपचे जिल्ह्यातील मोठे पदाधिकारी आणि नेतेमंडळी सोबत होती. महायुती बुलढाण्यात फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही पक्ष आता स्वबळावर लढत आहे. विशेष म्हणजे महायुतीमधील तिसरा घटक राष्ट्रवादी अजीत पवार गटाने भाजपसोबतचे सख्य कायम ठेवल्याचे दिसून येत आहे. बुलढाण्यात शिवसेना शिंदे गटाविरोधात भाजप आणि अजीतदादांची राष्ट्रवादी एकत्रीतपणे निवडणूक लढविणार आहे. आतापर्यंत आ. संजय गायकवाड आणि विजयराज शिंदे एकमेकांच्या विरोधात अनेकदा उभे ठाकले. आता पहिल्यांदाच त्यांच्या पत्नी पण एकमेकींविरोधात निवडणूक लढवित आहेत. सौ. पूजाताई आणि सौ. अर्पिताताई यांच्यात जोरदार लढतीचा अंदाज राजकीय विलेषक करीत आहेत. पूजाताईंचे पति संजय गायकवाड यांच्या नावात जय आहे, तर अर्पिताताईंचे पति विजयराज शिंदे यांच्या नावातही जय आहे..निवडणूकीत कुणाची जय होते, कुणाची पराजय ? हे बुलढाणेकर मतदार ठरवतील. या दोघांना सोडून तिसरा किंवा चौथा पर्याय निवडला जाईल का ? हे सांगणे सध्या तरी शक्य नाही.
आतापर्यंत नेते भांडायचे आता त्यांच्या बायका पण अमोरासमोर !



