बुलढाणा, 2 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : भारतीय जनता पक्षाचे जुने व सक्रिय कार्यकर्ते पद्मनाभ जगदेवराव बाहेकर यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच बूथ प्रमुख पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सादर केला आहे. राजीनामा पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, सन 2002 पासून ते भारतीय जनता पक्षात सक्रियपणे कार्यरत आहेत. 2002 पासून ते पक्षाचे प्राथमिक व क्रियाशील सदस्य असून 2025 पर्यंत पक्षाने त्यांच्यावर विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. भाजयुमो विद्यार्थी आघाडी शहर अध्यक्ष, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणीस अशी अनेक पदे त्यांनी निष्ठेने पार पाडली आहेत.
तसेच सन 2014 पासून बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक 189 व 190 चे बूथ प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. या काळात पक्षातर्फे झालेल्या बैठका, मेळावे, आंदोलने व मोर्चांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवला आहे. या आंदोलनांदरम्यान त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी काही प्रकरणे अद्याप प्रलंबित असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
मात्र, नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या राहत्या प्रभागातून उमेदवारीसाठी दावा व अर्ज सादर करूनही त्यांच्या दीर्घकालीन सेवेचा व निष्ठेचा विचार न करता इतर पक्षातून आलेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच दुसऱ्या प्रभागात तयारी करायला लावून तेथेही काँग्रेसमधून आलेल्या उमेदवाराला वेळेवर उमेदवारी देण्यात आल्यामुळे आपण व्यथित झाल्याचे त्यांनी राजीनाम्यात म्हटले आहे.
या सर्व कारणांमुळे वैयक्तिक कारणास्तव पक्षातील सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त करत त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व बूथ प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.



