बुलढाणा, 8 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : अन्न व औषध प्रशासनातील उल्लेखनीय व जबाबदारीची कामगिरी बजावणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन घिरके यांचा मराठा सेवा संघाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार सोहळा जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ, सिंदखेडराजा येथे सोमवार, १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कोरोना काळात अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून औषधे, सॅनिटायझर, मास्क तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवत, बनावट व निकृष्ट दर्जाच्या औषधांवर कठोर कारवाई करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतलेले हे निर्णय अत्यंत महत्त्वाचे ठरले. या संपूर्ण काळात सहाय्यक आयुक्त गजानन घिरके यांनी जिल्ह्यातील यंत्रणेशी समन्वय साधत प्रभावीपणे जबाबदारी पार पाडली.
मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात त्यांच्या या सामाजिक व प्रशासकीय योगदानाची दखल घेत त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
जिजाऊ सृष्टीसारख्या प्रेरणादायी ठिकाणी होणारा हा सत्कार नव्या पिढीसाठीही सेवाभाव व कर्तव्यनिष्ठेचा संदेश देणारा ठरणार आहे.