बुलढाणा नगर पालिकेच्या तीन स्विकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड
बुलढाणा, ९ जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा नगर पालिकेच्या तीन स्विकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये उदय देशपांडे, प्रा.सुनिल सपकाळ, मोहन पर्हाड यांना संधी देण्यात आली आहे.
बुलढाणा नगर पालिकेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. २१ डिसेंबर झालेल्या मतमोजणीत शिवसेनेच्या पुजाताई संजय गायकवाड या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. आ.संजय गायकवाड यांनी शिवसेनेचे २२ नगरसेवक निवडून आणत बुलढाणा नगर पालिकेत इतिहास घडवला. राज्य युवा सेना कार्यकारणी सदस्य कुणाल संजय गायकवाड यांची बुलढाणा नगर पालिकेच्या गटनेते पदी निवड करण्यात आली. नगराध्यक्षांचे एक मत असे मिळून कुणाल गायकवाड यांना ३० जणांचा पाठिंबा मिळाला. बुलढाणा नगर पालिकेच्या स्विकृत नगरसेवकांसाठी आज नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना उबाठा यांच्याकडे पुरसे संख्या बळ नसल्याने कुणी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे शिवसेनेकडून उदय देशपांडे, प्रा.सुनिल सपकाळ, मोहन पर्हाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी दोन वेळा सुनील सपकाळ यांनी नगरपालिका निवडणूक लढली आहे परंतु दोन्ही वेळेस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता निवडणूक हरूनही ते बाजीगर ठरले आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी त्यांना न्याय दिला आहे. यामुळे आता नगर पालिकेत शिवसेना गटाचे संख्याबळ ३३ झाले आहे.



