spot_img

सुन खट्याळ अन नाठाळही…! सासू आणि पतीला मारहाण करणाऱ्या सुनेला जेल

बुलढाणा, १५ जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : सासू खट्याळ असल्याचे अनेक घटना घडतात. पण सुन खट्याळच नाही तर सासूला मारहाण केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून स्वतःच्या सासू व पतीला गंभीर मारहाण करणाऱ्या सुनेला बुलढाणा येथील न्यायालयाने दोषी ठरवत तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची व दंडाची शिक्षा सुनावली आहे. ज्येष्ठ नागरिकांवरील घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात न्यायालयाचा हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. बुलढाणा शहरातील समर्थ नगर भागात वास्तव्यास असलेल्या कमल श्रीराम राठोड (वय ७९) यांच्याशी त्यांची सून मिनल पंकज राठोड (वय ३२) हिचा २४ ऑगस्ट २०२३ रोजी घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादातून आरोपी मिनल हिने रागाच्या भरात आपल्या ७९ वर्षीय सासूला धक्का देऊन गंभीर दुखापत केली. तसेच आईला वाचविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पती पंकज राठोड यालाही मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कमल राठोड यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलीसांनी गुन्हा क्र. ७६३/२०२३ नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ३२५, ३२३ व ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस अंमलदार नामदेव खवले यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

सदर खटल्याची सुनावणी बुलढाणा येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग (न्यायालय क्र. २) समोर झाली. न्यायाधीश पंकज देशपांडे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. सरकारी पक्षाकडून सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सादर पुरावे व साक्षीदारांच्या जबाबांवरून आरोपीचा दोष सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने आरोपी मिनल राठोड हिला तीन महिने साधा कारावास व ६ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी ५ हजार रुपये फिर्यादी कमल राठोड यांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे, तर उर्वरित रक्कम सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणात सरकारी अभियोक्ता अॅड. वैशाली कस्तुरे, अॅड. स्वाती जयस्वाल व अॅड. सचिन देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने लेखी युक्तिवाद एडवोकेट प्रवीण वाघमारे यांनी केला होता. तर पोलीस अंमलदार गजानन मांटे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
ज्येष्ठ नागरिकांवरील घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात न्यायालयाने दिलेला हा निकाल समाजासाठी दिशादर्शक असून, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी तो एक महत्त्वाचा आदर्श ठरेल, अशी चर्चा परिसरात होत आहे.

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत