जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचा पुढाकार; शेतकरी म्हणाले ‘देवदूत’
बुलढाणा, १६ जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः कितीही मोठा अंधार असला तरी एक ‘किरण’ही त्याला भेदू शकते. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची बुलढाण्यातील कारकीर्द उल्लेखनीय ठरत आहे. सर्वच क्षेत्रात बुलढाणा अग्रेसर करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. आता त्यांनी एक नवी कामगिरी केली आहे. जिल्ह्यात अवैध सावकारी कर्जाच्या त्रासातून होणारी शेतकर्यांची पिळवणूक आणि आत्महत्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी पुढाकार घेवून जिल्ह्याच्या विविध भागातील अवैध सावकाराकडील जमीनी परत करण्याची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमीनी परत मिळाल्या त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून सत्कार करुन आभार व्यक्त केले. जिल्हाधिकारी आमच्यासाठी देवदूतच असल्याची भावना शेतकर्यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमातील कलमांनुसार अवैध सावकाराकडील जमीनी शेतकऱ्यांना परत करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जलदगतीने सुनावणी घेवून प्रकरण निकाली काढले जात आहेत. यातील बहुतांशी प्रकरणांमध्ये चौकशीअंती शेतकऱ्यांच्या बाजून निर्णय दिले जात असून अवैध सावकारांवर गुन्हा देखील दाखल केले जात आहे. या मोहिमेसाठी जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी घेतलेला पुढाकार आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या कामकाजाचे कौतुकही शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
या शेतकर्यांमध्ये विशेषतः नागेश केशव कोल्हारे रा. घाटबोरी ती. मेहकर यांची सावकाराकडील ३ एकर २४ गुंठे जमीन, विजय बा. व्यवहारे रा. पोफळी ता. मोताळा यांची ६२ गुंठे जमीन, रविंद्र कांडेलकर रा. वाघोळा ता. मलकापूर यांची ८२ गुंठे जमीन, विजय रामदास राठोड रा. हिवरा गडलिंग ता. सिंदखेड राजा ७ एकर ३० गुंठे, शंकर कोंडिबा वाघ रा. पांगरी ता. देऊळगाव राजा यांची १.३८ हेक्टर, संजय उत्तम पाचरणे रा. मेहकर यांची ०.७१ हेक्टर जमीन त्यांना परत मिळाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी सावकारी कर्जामुळे मातृत्व हरवलेल्या वैष्णवी ढोले या मुलीने देखील तीच्या संघर्षात जिल्हाधिकार्यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी शेतकर्यांचा सत्कार स्वीकारुन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाने लोकहिताचे कायदे केले आहेत. जिल्ह्यात या कायद्यांची चोख अंबलवजावणी करुन शेतकरी व नागरिकांना न्याय देण्याचे माझे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बुलढाणा जिल्ह्यात अवैध सावकारांकडून होत असलेली पिळवणूक रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू असून शेतकर्यांनी निर्भयपणे तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या लोकोपयोगी कार्याबद्दल शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या चिखली येथील शिवाजी विद्यालयामार्फत जिल्हाधिकारी डॅा किरण पाटील यांचा सत्कार देखील करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
अवैध सावकारांकडील ७४ हेक्टर शेतजमीन शेतकर्यांना परत
यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक प्रशासनाने मोहिमेंतर्गत महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमातील कलमांनुसार जिल्ह्यातील ६९ प्रकरणातील अवैध सावकारांकडील ७४.२७ हेक्टर आर शेतजमीन शेतकर्यांना परत करण्यात आली आहे. यात ५५ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ६५१ प्रकरणांची चौकशी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.



