बुलढाणा 20 जानेवारी ( गुड इव्हीनींग सिटी ): बुलढाणा शहर पोलिसांनी हरविलेले एकूण ५४ मोबाईल फोन शोधून काढत ते मूळ मालकांच्या ताब्यात देण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलिस स्टेशन, बुलढाणा शहर अंतर्गत कार्यान्वित असलेल्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या पोर्टलचा प्रभावी वापर करत ही कारवाई करण्यात आली.
बुलढाणा शहर पोलीस स्टेशन हद्दीत हरविलेल्या मोबाईलचा शोध घेत मागील महिन्यात सीबीआयआर पोर्टलच्या माध्यमातून ३८ मोबाईल हँडसेट तर तपासादरम्यान आणखी १६ मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात आले. विविध कंपन्यांचे हे एकूण ५४ मोबाईल अंदाजे १० लाख रुपयांच्या किंमतीचे आहेत. हस्तगत मोबाईलच्या मूळ मालकांची खात्री करून ते संबंधितांना परत करण्यात आले.
हा मोबाईल सुपुर्द कार्यक्रम विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, पोलीस अधीक्षक, बुलढाणा निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक, खामगाव श्रेणीक लोढा, अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा अमोल गायकवाड, आयपीएस अदित्य सिंग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, बुलढाणा सुधीर पाटील तसेच बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवि राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस स्टेशन बुलढाणा शहरचे ठाणेदार रवि राठोड यांच्यासह सीईआयआर पोर्टलचे कामकाज पाहणारे पोलीस उपनिरीक्षक रवि मोरे, पोलीस अमलदार युवराज शिंदे, दिपक चव्हाण, विनोद बोरे, मनोज सोनुने तसेच महिला पोलीस अमलदार मोहिनी चव्हाण यांनी सक्रिय सहभाग घेतला. हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून बुलढाणा शहर पोलिसांच्या या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



