spot_img

निलेश पाटील हल्ला प्रकरणातील दोन्ही आरोपी पुण्यातून ताब्यात

बुलढाणा, २१ जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) ः कोलवड बस स्टँड चौकात सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील यांना लोखंडी फायटरने जबर मारहाण करून फरार झालेल्या दोन आरोपींना बुलढाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मागील दोन आठवड्यांपासून फरार असलेले आरोपी आदेश राठोड आणि सूरज पसरटे या दोघांना वाघोली,पुणे येथील त्यांच्या मित्राच्या फ्लॅटवरून अटक करण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींना आश्रय देणार्‍यांविरोधात तसेच या हल्ल्याच्या ‘मास्टरमाईंड’ विरोधातही सहआरोपी म्हणून कारवाई करावी, अशी मागणी सामान्यांकडून केली जात आहे. बुलढाणा तालुक्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रीय असलेले निलेश संतोषराव पाटील (वय ४५ वर्षे) रा. कोलवड ता. बुलढाणा) हे ६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास एमएच-२८-बीव्ही-२४७५ क्रमांकाच्या स्कुटीने दैनंदिन कामे आटोपून घराकडे परत निघाले होते. कोलवड येथील बसस्टँड चौकात पोहोचल्यानंतर एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने त्यांचा रस्ता अडवला. त्यामुळे निलेश पाटील यांनी गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्यावेळी आरोपी आदेश सुनिल राठोड (वय २२) क्रीडा संकुल रोड, आयटीआय कॉलनी आणि सुरज मोतीराम पसरटे (वय २३) रा. विजय नगर, सुंदरखेड यांनी आम्ही गाडी बाजूला काढत नाही, असे म्हणत त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी फायटरने निलेश पाटील यांच्या डोक्यावर, नाकावर आणि तोंडावर वार केले. या हल्ल्यात जखमी होऊन पाटील खाली पडल्यानंतरही आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. काही जणांनी मध्यस्थी केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला होता. याप्रकरणी नीलेश पाटील यांनी बुलढाणा शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपींचे लोकेशन वेळोवेळी बदलत होते…
तेव्हापासून आदेश आणि सूरज दोघेही फरार होते. वेळोवेळी त्यांचे लोकेशन बदलत होते. पोलिसांचे एक पथक आरोपींच्या मागावर होते. तांत्रिक मदत आणि गुप्त माहितीच्या आधारावर आरोपींचे लोकेशन वाघोली परिसरात आढळले. काल, मंगळवार, २० जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास पोलिस थेट वाघोलीतील त्या फ्लॅटवर पोहोचले, ज्या ठिकाणी आरोपी आदेश आणि सूरज लपून बसलेले होते. दोघांनाही ताब्यात घेवून थेट बुलढाणा येथे आणले गेले. ही यशस्वी कामगिरी पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड आणि श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनात एलसीबी प्रमुख सुनिल अंबुलकर यांच्या आदेशाने पीएसआय अविनाश जायभाये, हेकॉं दीपक लेकुरवाळे, चांद शेख, गणेश पाटील, कॉं. गजानन गोरले, हेकॉं राजु आडवे, पवन मखमले आणि चालक पोलिस कर्मचारी निवृत्ती पुड यांच्या पथकाने पार पाडली.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत