पाच जिल्ह्यातील कर्मचारी खेळाडू मैदानात उतरणार
बुलढाणा, ११ फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) ः जिल्हा क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनानंतर बुलढाणा जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या नेतृत्वात अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. या संपूर्ण क्रीडा महोत्सवात अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि आयुक्त कार्यालय अशा ६ टिम सहभागी होत असून एकुण ११७७ पुरुष-महिला कर्मचारी खेळाडू बुलढाण्यातील जिल्हा क्रीडा संकुलच्या मैदानावर स्पर्धेसाठी उतरणार आहे.
सीईओ गुलाबराव खरात यांनी सदर क्रीडा स्पर्धांबाबत आज, त्यांच्या दालनात पत्रकारांना माहिती दिली. विभागीय क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक बाबीचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले असून कुणाचीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी जवळपास ८५ अधिकार्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या वतीने अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव सन २०२६ चे आयोजन १२ ते १४ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुल, जांभरुण (बुलढाणा) येथे हा महोत्सव उत्साहात पार पडणार असून विभागातील विविध जिल्ह्यांतील अधिकारी, कर्मचारी व शिक्षक सहभागी होणार आहेत.
महोत्सवात मैदानी व सांघिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन गुरुवार, १२ ते शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या वेळेत करण्यात आले आहे. याच कालावधीत १२ व १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० ते रात्री १० वाजेपर्यंत सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता अमरावती विभागाच्या आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. किरण पाटील, जिल्हाधिकारी, बुलढाणा राहणार आहेत.
प्रमुख उपस्थितीत बुलढाणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक तांबे, बुलढाणा, अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता महापात्र, यवतमाळ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, वाशिम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम तसेच संतोष कवडे, अपर आयुक्त (आस्थापना), अमरावती आणि बाळकृष्ण महानकर, जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
उद्घाटनानंतर सायंकाळी ५.३० वाजता उद्घाटन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यास गुलाबराव खरात व राजीव फडके, अपर आयुक्त (विकास), अमरावती यांची उपस्थिती राहणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण समारंभ शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे. या समारंभास सर्व विभाग प्रमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात सर्व विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच सर्व संवर्गीय अधिकारी, कर्मचारी व शिक्षक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अति. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य नियंत्रक बाळासाहेब मोहन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव आशिष पवार आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील यांनी केले आहे.
अमरावती विभागातील क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील कौशल्याला व्यासपीठ मिळावे, तसेच परस्पर स्नेह व समन्वय वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
निवास व्यवस्थेचे उत्तम नियोजन
यवतमाळ आणि वाशिम येथील पुरुष कर्मचार्यांसाठी बसस्टॅण्डसमोरील सैनिकी मंगल कार्यलयात व्यवस्था करण्यात आली आहे. तर अकोला येथील पुरुष कर्मचार्यांना ओंकार लॉन्स, धाड नाका तसेच अमरावतील येथ्थील पुरुषांना बी.के. लॉन्स धाड नाका येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. बुलढाण्यातील पुरुष कर्मचार्यांना ग्रामसेवक प्रशिक्षण केेंद्र, कारागृहाजवळ याठिकाणी राहता येईल. महिलांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातू यवतमाळ, वाशिम, अकोला आणि अमरावतीच्या महिला कर्मचार्यांची व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल येथे केली गेली असल्याचेही खरात यांनी सांगितले.



