बुलढाणा, 16 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : विद्यार्थ्यांनी भरलेले इको पिकअप वाहन आणि बुलेट मध्ये टक्कर होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सायंकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान बुलढाणा देऊळघाट मार्गावर निवांत हॉटेलच्या थोडे समोर हा भीषण अपघात घडला. बुलढाणा मधील विविध शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर देऊळघाट येथे त्यांच्या घरी पोहोचण्याचे काम काही वाहने करतात. त्यातीलच एका पीकअप वाहनाचा हा अपघात घडला आहे. सात ते आठ विद्यार्थी या वाहनात होते. देऊळघाटकडे परतणाऱ्या या वाहनाची टक्कर बुलेट सोबत झाली. बुलेटवर स्वार दोन्ही युवक देऊळघाटकडेच परत जात होते. काहींचे म्हणणे आहे की बुलेटने अचानक टर्न घेतल्यामुळे हा अपघात घडला. टक्कर झाल्यानंतर पिकप दोन वेळा पलटी झाल्याचेही समजते. दुर्दैवाने बुलेटवर स्वार रियाज बेग जफर बेग (वय 38) राहणार देऊळघाट आणि मोहम्मद तौसिफ मोहम्मद युसुफ वय 38 राहणार शेंदुर्णी जामनेर दोघेही गंभीर जखमी झाले. त्यातील मोहम्मद तौसिफ गतप्राण झाला. मोहम्मद तौसिफ हा देऊळघाटला आपल्या मामाकडे आलेला होता. इकडे पिकप वाहनातील महेश गणेश कानडे, रुद्र गजानन कटक, राजश्री शिवा माळोदे आणि शेजल शंकर कटक हे चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रवींद्र राठोड तातडीने आपल्या पथकासह रुग्णालयात दाखल झाले होते. चिंतित पालकांनीही जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.



