spot_img

“हद्दवाढीची हुकूमशाही मोडून काढू” : बुलढाणा नगर प्रशासनाविरोधात लगतच्या गावांचा एल्गार

बुलढाणा, 17 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज हजारो ग्रामस्थ धडकले होते.. पुरुष आक्रामक होते… महिलांच्या हातात बोर्ड-बॅनर होते.. उन्हाची पर्वा न करता आबालवृद्ध रस्त्यावरर उतरले होते.. अर्थात कुठलीच घोषणाबाजी किंवा नारेबाजी नव्हती कारण मोर्चा मूक होता.. सागवन, सुंदरखेड, जांभरून, येळगांव, माळविहीर अशा गावचे महिला पुरुष बुलढाणा नगर प्रशासनाच्या विरोधात एकवटले होते.. शहराची ट्रॅफिक जाम करणारा आणि पोलिसांना घाम फोडणार्‍या हा मोर्चा कशासाठी ? असाच प्रश्न तुम्हांला पडला असेल.. नगर परिषदेच्या विरोधात ही गांवं का पेटलीत, याचं कारण म्हणजे शहराची हद्दवाढ करण्याचा नगर परिषदेनं घेतलेला निर्णय… लगतच्या गावांना शहरात जोडून हद्दवाढीचा प्रस्ताव नगर परिषदेनं घेतलाय… आज सागवन, येळगांवसह इतर गावांची मिळून तयार झालेल्या गांव बचाव कृती समितीनं आंदोलनातून या संभावित हद्दवाढीला प्रखर विरोध केलाय…समितीच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना मागण्याचं निवेदन दिलं.. हद्दवाढीचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, ही मुख्य मागणी करण्यात आलीय.. शिष्टमंडळात डी.एस. लहाने, सुनिल सोनुने, ऍड. दशरथसिंग राजपूत, सतिष भाकरे पाटील, रविंद्र भाकरे पाटील, प्रतिक जाधव, सुरेश कंकाळ, श्रीकांत जाधव, अनिता जाधव आदिंचा समावेश होता.

निवेदनात म्हटलंय की, हद्दवाढीचा प्रस्ताव अन्यायकारक आहे.. स्वतःच ठराव घेवून स्वतःची हद्दवाढ करवून घेण्याचा कोणताही अधिकार नगर परिषदेला नाही. नगर परिषद हद्दीत सामिल व्हायचे की नाही, हे ठरविण्याचा अधिकार जनतेचा, ग्रामपचायतचा आणि ग्रामसभेचा आहे. वरील सर्व ग्रामपंचायतींनी ठराव देवून हद्दवाढीला विरोध केला आहे. हद्दवाढ प्रस्तावासोबत तहसीलदार बुलढाणा यांनी नागरी क्षेत्र व अकृषक क्षेत्र, तसेच अकृषक रोजदारीची टक्केवारी याबाबत कुठलीही चौकशी न करता चुकीचे अहवाल दिले आहे. जिल्हाधिकारी आणि नगर परिषदेने अगदी हुकूमशाही पद्धतीने नियमांचे उल्लंघन करून सदरचा हद्दवाढ प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे. तो आम्हांला मान्य नाही. सदरचा अन्यायकारण आणि गावाच्या सार्वभौमत्वाला बाधा पोहोचविणारा हद्दवाढ प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

गावागावांमध्ये अनेकदा पटत नाही.. परंतु चार ते पाच गावे जर एकत्रीतपणे येवून लढा देत असतील तर नक्कीच प्रकरण गंभीराय.. कारण आमदार संजय गायकवाड हद्दवाढीसाठी जोरदार प्रयत्न करताय… बुलढाणा नगर परिषदेनं सहा वर्षांपूर्वी २१ डिसेंबर २०२० रोजी यासंदर्भात ठराव घेतलाय.. ज्यात सुकाळखेड, माळविहीर, जांभरून, येळगांव, सागवन, सुंदरखेड यांना शहरात अंतर्भूत करावे, असं ठरावात नमूदाय.. त्यावर सूचक म्हणून तत्कालिन नगरसेव आशिष जाधव आणि अनुमोदक म्हणून दीपक सोनुने यांचा उल्लेखाय.. विशेष म्हणजे तत्कालिन नगराध्यक्षा मो. नजमुन्नीसा यांचीही स्वाक्षरी सदर ठरावावर आहे.

त्यानंतर संबंधीत गावांनी नगर परिषदेला आपला विरोध कळविलाय.. मागील पाच वर्ष हे प्रकरण थंड बस्त्यात होतं.. परंतु मागील दोन महिन्यांपासून पुन्हा हद्दवाढीच्या प्रश्नानं उचल खाल्लीय.. आमदार संजय गायकवाड हद्दवाढीचं जोरदार समर्थन करतायेत.. विकासासाठी हद्दवाढ आवश्यक असल्याचं त्यांचं म्हणणाय.. इकडे मात्र गावकरीही आंदोलनाच्या भूमिकेतायेत.. आज मोठ्या संख्येने जनआक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला.. मोर्चानं शहरवासियांचं लक्ष वेधलं होतं…

निश्चीतच गावकरी जर हद्दवाढीला विरोध करीत असतील तर ही बाब आता जिल्हा प्रशासनापुरती राहीली नाही.. हा प्रश्न मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचविण्याची आंदोलकांची तयारीय.. त्यामुळे आमदार संजय गायकवाड आणि जिल्हा प्रशासनाला गावकर्‍यांचे योग्य समुपदेशन करीत सामोपचारानं हा प्रश्न हाताळावा लागेल, हेच स्पष्ट होत आहे.

 

 

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत