बुलढाणा 18 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा 23 ते 26 फेब्रुवारीदरम्यान शेगाव येथे अधिकृत दौरा निश्चित झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येत असून 25 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आवारात उपस्थित असताना सार्वजनिक दर्शन तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहे.
प्रशासनाच्या सूचनेनुसार, 23 ते 26 फेब्रुवारीदरम्यान सर्व यात्रिनिवास, मंदिर परिसर आणि प्रमुख मार्गांवर कमांडो व सुरक्षा तैनाती करण्यात येणार आहे. विशेषतः 25 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींची उपस्थिती असताना मंदिर परिसरात सर्वसामान्य भाविकांना प्रवेश बंद राहील. त्यामुळे दर्शनासाठी येऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी व नागरिकांनी या कालावधीत भेट टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दौऱ्याच्या अनुषंगाने शहरातील वाहतूक व्यवस्थेतही तात्पुरते बदल करण्यात येणार असून, काही मार्गांवर वाहतूक वळविण्यात येईल. सुरक्षा कारणास्तव ओळखपत्र तपासणी, बॅरिकेडिंग आणि प्रवेश नियंत्रणाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करत, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही स्पष्ट केले आहे. भाविकांनी आपली यात्रा नियोजन करताना वरील तारखांचा विचार करावा, असे सांगण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शेगाव शहरात उत्साहाचे वातावरण असून, सुरक्षा आणि शिस्तबद्ध व्यवस्थेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.