दहा एजंटांकडे दहा मशीन पण एकच मशीन ऍक्टीव्ह ः चोरुन-लपून गरीबांची आर्थिक पिळवणूक
बुलढाणा, ७ मार्च (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः ज्यांना ज्यांना एसटी महामंडळाची सवलत हवी असेल त्यांनी एनसीएमसी कार्ड (नॅशनल कॉमन मोबीलिटी कार्ड) ज्याला मराठीत ‘राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड’ असे संबोधले जाते, ते आवश्यक असणार आहे. साहजीकच राज्यभरात कार्ड मिळविण्यासाठी झुंबड उडाली आहे. बुलढाण्यातील सर्व आगारांमध्ये विद्यार्थी, दिव्यांग, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक सर्व काम धंदे सोडून रांगेत लागत आहेत. आपलं काम झालं पाहीजे, लवकर झालं पाहीजे, या मनोभूमिकेतून १९९ रूपयांच्या कार्डसाठी ५०० रूपयांपर्यंत मोजण्याची काही जणांची तयारी असल्यामुळे दलालांचे फावत आहे. दुर्दैवाने एनसीएमसी कार्ड योजनेमध्ये दलालांचा शिरकाव झाला असून बुलढाणा आगारात एकच मशीन सुरु आहे. एसटी महामंडळाच्या नियंत्रणाबाहेर हे सर्व आहे. एनएसडीएल आणि एसजीआर कंपनीकडून कार्ड बनविण्यासाठी १४३ एजंटांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका डेपोसाठी जवळपास १० एजंट काम करणार आहेत. परंतु प्रत्येक डेपोमध्ये केवळ एकच मशीन ऍक्टीव्ह आहे. जिथे दहा एजंटांनी दहा मशीनवर काम करायचे आहे, तिथे एकच मशीन काम करत असल्यामुळे आगारामध्ये कार्ड मिळविण्यासाठी लोक एकमेव काऊंटरवर तुटून पडत आहे. गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार खरी मेख अशी आहे की, जाणुनबूजून इतर मशीन ऍक्टीव्ह न करता गर्दीचा फायदा घेवून १९९ रूपयांच्या कार्डसाठी दोनशे ते तीनशे रूपयांची लाच घ्यायची आणि कार्ड उपलब्ध करून द्यायचे. एनसीएमसी कार्डमध्ये दलालांचा मोठा सुळसुळाट झाल्याच्या तक्रारी गुड इव्हिनिंग सिटीला प्राप्त झाल्या आहेत. राज्य परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक तथा जिल्हाधिकरी महोदयांनी सदर बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. याशिवाय राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनीही याविरोधात आवाज उठविण्याची आवश्यकता आहे. गरीबांची आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी संबंधीतांकडून एक-एकच मशीन पुरविली जात आहे.
याबाबत बुलढाणा आगार व्यवस्थापक श्री गडलिंग यांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले की, सदर कंपनीवर आमचे कुठलेही नियंत्रण नाही. कार्ड देण्यासाठी जागा आणि गर्दीच्या नियोजनासाठी एक सिक्युरिटी गार्ड पुरविण्याव्यतिरीक्त आमचा या प्रकाराशी संबंध नाही. जर कुणी यात दलाली करत असेल तर ती गंभीर बाब आहे, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्व विभाग नियंत्रकांना परिपत्र पाठविले आहे. त्यामध्ये एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड) बंधनकारक करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. हे कार्ड कुठल्याही बस स्टॅण्डवर बनवून मिळणार आहे. प्रिपेड वॉलेट सारखं हे काम करणार असून १९९ रुपये त्याची किंमत आहे. त्यात किमान १०० रुपयांचा बॅलेन्स कायम ठेवावा लागणार आहे. यासाठी ५० रुपयांच्या पटीत ते रिचार्ज करता येणार आहे. हे कार्ड थेट आधार कार्डशी कनेक्टेड असल्याने वेगळे आधार कार्ड दाखविण्याची गरज संपणार आहे. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी, ज्येष्ठनागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य महिला, दिव्यांग जन, विविध पुरस्कारप्राप्त व्यक्ती, विविध व्याधीग्रस्त रुग्ण इत्यादींचा समावेश आहे. या कार्डमध्ये सवलतीच्या प्रकारानुसार सवलतीची टक्केवारी, किलोमीटर इत्यादींची माहिती असेल.