बोथा घाटात रात्री प्रवासबंदीचा फज्जा ; साहेबांच्या गाड्यांसाठी उघडते गेट !
ज्या लोकांवर प्रवेशबंदीच्या आदेशाच्या पालनाची जबाबदारी आहे, तेच जर कायदा मोडत असतील तर कुणाकडे जावे. ः‘चिंगारी कोई भडके, तो सावन उसे बुझाये, सावन जो आग लगाये, उसे कौन बुझाये ?’, असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. दोन्हीकडच्या गेटवर तैनात असलेल्या गरीब कर्मचार्यांची यात काय चूक ! गेट उघडले तर आदेशाचे उल्लंघन होते आणि नाही उघडले तर वरून साहेब नोकरीवरून काढून टाकण्याची भिती असते. सर्वांना माहित आहे की, ज्ञानगंगा अभयारण्यात खामगांव ते बुलडाणा मधील बोथा मार्ग रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत गृहविभाग/क.वि.-४.२/क.वि./८२७/२०१५/ १६ जुलै २०१५ रोजी तत्कालिन जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी काढलेल्या आदेशानुसार बंद करण्यात आलेला आहे. त्यासाठी पर्याय म्हणून वरंवड-उंद्री मार्ग देण्यात आलेला आहे. यामार्गाने ३५ ते ४० किलोमिटरचा ङ्गेरा पडतो. परंतु अभयारण्यातील जंगली प्राण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून राज्य शासनाने बोथा मार्ग रात्रीच्या वेळी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रात्रीच्या दरम्यान जंगलात अन्नाच्या शोधार्थ भटकंती करणार्या प्राण्यांचा वाहनांच्या धडकेत अपघाती मृत्यू होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर बोथा मार्ग रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत बंद करण्यात आला आहे. परंतु या आदेशाची काटेकोरणपणे अंमलबजावणी होत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. व्हीआयपी, नेतेमंडळी तसेच वनविभागाच्या अधिकार्यांच्या नातेवाईक-मित्रमंडळींसाठी हा मार्ग २४ तास खुला आहे.
ज्यावेळी हा आदेश जारी करण्यात आला, त्यावेळी तर धुरंधर वाघ नव्हता देखील. आता मात्र ज्ञानगंगा अभयारण्याला व्याघ्रवैभव प्राप्त झाले आहे. त्याचे जतन आणि संवर्द्धन करण्याची जबाबदारी जशी प्रशासनाची आहे तशीच ती प्रत्येक बुलढाणेकरांचीही आहे. सामान्यांकडून आदेशाचा आदर केला जातो. आदेश मोडतात ते व्हीआयपी लोक! रात्रीच्या वेळी आपातकालिन परिस्थीतीत अथवा वैद्यकीय कारणास्तव वाहनांना आवागमनाची विवेकनिष्ठ परवानगी आपण समजू शकतो. परंतु केवळ साहेबी थाट आणि लवाजमा घेवून मिरविणार्यांसाठी गेट का उघडले जावे ? लाखोंच्या गाड्यांच्या मालकांना २० किलोमिटरचे अंतर अधिक वाटावे, ही शोकांतिका आहे. मोताळा-नांदुरा, वरवंड-उंद्री या मार्गांचा अवलंब केला जावू शकतो.
अनेक वर्षांपासून असेच सुरु आहे. रात्रीतून गेट कधी ना कधी उघडले जातात. परंतु आता धुरंधर वाघासाठी तरी बोथा घाट प्रवेशबंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, हीच अपेक्षा. अन्यथा हा पीकेटी७सीपी१ वाघ आधीच्या टी१-सी१ प्रमाणे निघून जाण्याचा धोका आहे.
यंत्रणाच कायदे मोडत असतील तर न्याय कोणाकडे मागावा ? ः जितेंद्र जैनसामाजिक कार्यकर्ते जितेंद्र एन. जैन यांनी यासंदर्भात यंत्रणेच्या कायदेभंगाला घेवून तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, परवा रात्री शेगाव दर्शन करून परत येत असताना माझ्या वाहनासाठी गेट उघडले नाही. परंतु मागील महिन्यामध्ये पोलीस भरतीच्या काळात बोथा मार्गे खामगाव बुलढाणा या रस्त्यावर शासकीय अधिकार्यांची, कर्मचार्यांची वाहने ये जा सुरू होती असे माहित पडले होते. त्याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहे. म्हणजे बोथा मार्गे शासकीय अधिकार्यांच्या कर्मचार्यांच्या गाड्या जर गेल्या तर जंगली प्राण्यांना त्या वाहनापासून कोणत्याही प्रकारची इजा होत नाही, परंतु जर सामान्य नागरिकांची गाडी गेली तर त्यापासून जंगली प्राण्यांना, जनावरांना धोका आहे, इजा होते असे यावरून सिद्ध होते. म्हणजे माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी काढलेल्या आदेशाचे पालन जर शासकीय अधिकारी आणि कर्मचारीच करत नसेल किंवा त्यांना वेगळा न्याय आणि सर्वसामान्य नागरिकांना वेगळा न्याय असे का ? आणि जर ठराविक लोकांसाठीच बोथा मार्गे रस्ता चालू ठेवायचा असेल तर तो सर्वसामान्यांसाठी सुद्धा २४ तास खुला करावा अशी मागणी जितेंद्र एन जैन सामाजिक कार्यकर्ते बुलढाणा यांनी केली आहे. जर शासकीय अधिकारी कर्मचार्यांच्या गाड्या ये जा करत असतील तर आम्ही सर्व सामान्य नागरिक सुद्धा सविनय कायदेभंग करून अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करून बोथा मार्गे बुलढाणा खामगाव येणे जाणे रात्री बे रात्री सुरू करू असा इशाराही जैन यांनी दिला आहे. या प्रकरणांमध्ये नुसते आदेश काढून भागत नाही जर आदेशाची अंमलबजावणी होत नसेल तर अशा प्रकारचा आदेश काढण्यास भाग पाडणार्या वन्यजीव सोयरे या सामाजिक संस्थेने दखल घ्यावी, असे आवाहनसुद्धा जितेंद्र जैन यांनी केले आहे.



