डॉ. किरण पाटील यांच्याविषयी काय म्हणाले प्रा. संजय खडसे??
प्रशासन म्हणजे केवळ आदेश, फाईली आणि नियम नव्हे; तर त्या मागे असलेली संवेदनशीलता, माणुसकी आणि लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची तळमळ असते. हीच जाणीव प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे जिल्हाधिकारी किरण पाटील सर.
दररोजप्रमाणे आजही only whatapp ग्रुप पाहताना सरांच्या बदलीचे आदेश दिसले आणि क्षणभर मन भरून आले. कारण हा केवळ बदलीचा आदेश नव्हता, तर एका प्रेरणादायी प्रशासकीय प्रवासाचा पुढील टप्पा होता. सरांचा सहवास, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनुभवलेली कार्यशैली ही प्रत्येकासाठी शिकण्यासारखी ठरली.आणि सरांकडून भरपूर शिकायला मिळाले.
सरांची कार्यपद्धती ही वेगळी आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेली आहे. वरून येणारे ताणतणाव स्वतःकडे ठेवत, खालच्या स्तरावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सदैव सकारात्मक ऊर्जा देणे, प्रत्येकाला समजून घेऊन काम करून घेणे आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे—ही त्यांची खासियत. म्हणूनच ते केवळ अधिकारी न राहता “अधिकारी माणसातील माणूस” म्हणून ओळखले गेले.
बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेली झेप उल्लेखनीय आहे. जिल्ह्याला GDPP मध्ये महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळवून देणे, पारधी बेडा विकासासाठी तातडीने जागा उपलब्ध करून देणे, छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर यशस्वीपणे राबवून सर्वसामान्यांना दिलासा देणे—ही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देणारी उदाहरणे आहेत.
महसूल विभाग अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. व्हॉट्सअॅप चॅटबॉट सारखी सहज-सुलभ प्रणाली, भूसंपादनासाठी विशेष सॉफ्टवेअर, जुन्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन, ऑनलाइन दस्तऐवज उपलब्धता—या सर्व उपक्रमांमुळे प्रशासन लोकाभिमुख झाले. तसेच सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देणे, ‘ही चावडी’ प्रकल्पात 100% वसुली, सातबारा संगणकीकरणात जिल्ह्याला अव्वल स्थान मिळवून देणे ही त्यांच्या कार्यक्षमतेची ठळक उदाहरणे आहेत.
अवैध वाळू उत्खननावर प्रभावी नियंत्रण, जिल्ह्यातील सर्व वाळू घाटाचे लिलाव करणे,RO मिटिंग मधील मार्गदर्शन हे महिण्याभराची ऊर्जा मिळायची त्यातून कामाला गती मिळायची सूक्ष्म मार्गदर्शन,जिल्ह्यातील प्रत्येक विषयाची माहिती,सर्व विभागावर जबरदस्त पकड आणि त्याच्या कडून काम करून घेण्याची हातोटी त्यामुळे सर्व विभागाला गतिमान प्रशासन मिळाले त्याचा जिल्ह्यातील विकासवर सकारात्मक परिणाम झाला तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये कायदेशीर बाबींवर भर देत पारदर्शक व यशस्वी अंमलबजावणी—या कार्यामुळे मतदान टक्केवारीत वाढ झाली, हे विशेष उल्लेखनीय आहे.
शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत त्यांची असलेली तळमळ आणि तत्परता हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख ठरली. त्यामुळेच बुलढाणा जिल्ह्यात त्यांचे नाव केवळ एक अधिकारी म्हणून नव्हे, तर लोकांच्या मनात स्थान मिळवलेले जिल्हाधिकारी म्हणून घेतले जाते.
सिंदखेडराजा उपविभाग प्रशासकीय दृष्टीने काम करण्यासाठी कठीण उपविभाग आहे पण सरांनी अचूक व मोलाचे मार्गदर्शन करून आमच्या कडून अडचणीवर मात करत काम करून घेतले,नव्हे आमच्या उपविभागात प्रत्यक्ष येऊन मार्गदर्शन केले,नव्हे आम्हाला लहान भावाप्रमाणे सांभाळले.हे आमच्या कायमस्वरूपी आठवणीत राहील.
आज दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी त्यांची आयुक्त, पशुसंवर्धन पदावर बदलीचे आदेश प्राप्त झाले,त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देताना, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ पुढेही मिळत राहील, हीच अपेक्षा
*प्रा. संजय खडसे
उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा*
दिनांक : 2/4/2026



