◾ मलकापूरात नकली नोटांचा पूर??
बुलढाणा, 6 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) : नकली नोटांचे केंद्र असलेल्या मलकापूरातील टोळीला जेरबंद करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात एलसीबीचे पथक धाडसी कामगिरी करीत आहे. आज सायंकाळच्या सुमारास चार आरोपींना नऊ लाख रुपयांच्या नकली नोटांसह रंगेहात पकडण्यात आले. आरोपी आणि पोलिसांमधील झटापटीत पथकातील एका पीएसआयला किरकोळ मार लागला आहे. दरम्यान पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.
सापळा रचून एलसीबी तयार होती. नकली नोटांचे रॅकेट मलकापूर आणि परिसरात सक्रिय असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले होते. बसस्टॅण्डच्या बाजूला आनंद सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यासोबत नकली नोटाही जप्त करण्यात आल्या. पाचशे रुपयांचे 18 बंडल, ज्यात वरून असली नोट तर बाकी गड्डीत नकली नोटा होता. तरुण युवकांच्या या टोळीत 22 ते 25 वयोगटातील तरुण आहेत. या टोळीने परिसरातील अनेकांना फसवले आहे. पण पोलिसांच्या धाकापायी आणि नसती भानगड नको म्हणून फसविले गेलेले लोक मूग गिळून गप्प आहेत, अशी गोपनीय माहिती गुड इव्हिनिंग सिटीला मिळाली आहे. तीन आरोपी स्थानिक असून चौथा मुक्ताईनगर महालखेडा येथील असल्याचे कळते.
इन्स्टावरून सौदेबाजी
नोटांच्या बंडलचे ढीग दाखवून लोकांना फसविण्यासाठी या टोळीने इन्स्टा आणि फेसबुकचा उपयोग केला. ज्यांनी संपर्क केला त्यांना जाळ्यात ओढायचे. आजच्या घटनेत अशीच एक लाखाच्या बदल्यात 9 लाख रुपयांच्या नकली नोटांची सौदेबाजी करण्यात आली होती. दस्तरखुद्द पोलिसांनी नकली ग्राहक बनून आरोपींसोबत इन्स्टा वर चॅटिंग केली होती आणि त्यानंतर आरोपींनी मलकापूर मध्ये येऊन मालाची डिलिव्हरी घेण्यासंदर्भात सांगितले. एलसीबीने काटेकोरपणे सापळा रचला आणि चारही जण रंगेहाथ पकडल्या गेले. आरोपींनी निसटून जाण्यासाठी पोलिसांसोबत झटापट केली. एकाने आपल्या जवळील छोट्या चाकूने पीएसआय अविनाश जायभाये यांना जखमी करण्याचाही प्रयत्न केला परंतु सतर्क पोलिसांनी चारही जणांना धाडस दाखवित जेरबंद केले.



