लोणारच्या युवकची हिंगोलीत हत्या
बुलढाणा १1 एप्रिल ( गुड इव्हीनींग सिटी ): हिंगोली जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि हादरवणारी टाकणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंध लपवण्यासाठी आणि प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या स्वतःच्या मुलालाच संपवण्याचा कट एका आईने रचल्याचं उघड झालंय. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा खून अज्ञात व्यक्तींनी केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांनी तपासाची दिशा वेगाने बदलत सोशल मीडियाच्या मदतीने मृताची ओळख पटवली. मृत तरुण हा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार परिसरातील वाढवण गावचा रहिवासी असून त्याचे नाव सचिन राजगुरू असं असल्याचं समोर आलंय. तपास पुढे सरकत असताना या प्रकरणाला वेगळं वळण आलं. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले. सचिनच्या हत्येमागे त्याचीच आई असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. लीलाबाई असं तिचं नाव असून तिचे एका ६५ वर्षीय रामदास तनपुरे याच्याशी प्रेमसंबंध होते. या संबंधांना सचिनचा विरोध होता आणि तो त्यांच्यासाठी अडथळा ठरत होता याच कारणामुळे आई आणि तिच्या प्रियकराने मिळून सचिनचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नरेश पवार नावाच्या व्यक्तीला २५ हजार रुपयांची सुपारी देत मुलाचा खून करण्याचा कट रचला. यानुसार, नरेश पवार याने सचिनची हत्या केली आणि मृतदेह जामदया शिवारात टाकून दिला.
पोलिसांनी तपास, मोबाईल लोकेशन आणि इतर पुराव्यांच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला. त्यानंतर लीलाबाई, तिचा प्रियकर रामदास तनपुरे आणि मुख्य आरोपी नरेश पवार यांना अटक करण्यात आलीये. सध्या तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे.