बुलढाणा, 12 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) : जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण वनसंपदा म्हणून ओळख असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्य येथे एक आश्चर्यकारक आणि तितकाच हास्यास्पद प्रकार समोर आला आहे.
ज्ञानगंगा अभयारण्याच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या फलकावर “ज्ञानगंगा भयारण्य” असा चुकीचा शब्दप्रयोग आढळून येत असून यामुळे वनविभागाची मोठी किरकोळ चूक चर्चेचा विषय बनला आहे. काही महिन्यांपूर्वी धुरंदर वाघाची एंट्री ज्ञानगंगा अभयारण्यात झाल्यामुळे त्याच्या भितीने प्रवेशव्दाराच्या फलकावरील अभयारण्य शब्द भयारण्य झाला की काय असा ही प्रश्न उपस्थित होत आहे.
“अभयारण्य” या शब्दाचा अर्थ वन्यजीवांना कोणत्याही भीतीशिवाय सुरक्षितपणे जगता यावे यासाठी निर्माण केलेले संरक्षित क्षेत्र असा होतो. अशा ठिकाणी प्राण्यांची शिकार, पकडणे किंवा त्यांना इजा पोहोचवणे कायद्याने बंदीस्त असते. त्यामुळे “अभय” म्हणजे भीतीचा अभाव हा त्यामागील मुख्य हेतू आहे.
मात्र, प्रवेशद्वारावरील फलकावर “भयारण्य” असा शब्द नजरेस पडत असल्याने अर्थाचा पूर्णतः विपर्यास झाला आहे. “भयारण्य” म्हणजे जिथे भीती आहे असे स्थान जो अभयारण्याच्या संकल्पनेलाच विरोध करणारा अर्थ ठरतो. या चुकीमुळे पर्यटकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. जिल्ह्यातील इतक्या महत्त्वाच्या कारण आता त्याठिकाणी “धुरंधर” वाघ व बिबट्यांचे दर्शन गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांना होत असल्याने या अभयारण्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पर्यटन व पर्यावरणीय स्थळावर अशा प्रकारची चूक दुर्लक्षित होणे हे वनविभागाचा निष्काळजीपणा आहे. वनविभागाने या प्रकरणाची दखल घेऊन लवकरात लवकर चूक सुधारावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.