▶▶ 2019 मध्ये 1 कोटी 63 लाख.. पाच वर्षांत झाले 5 कोटी 55 लाख
▶▶ वारसा हक्काने मिळाली सव्वा कोटीची शेती : सुपुत्र मृत्यूंजय 1.11 कोटींचे मालक
बुलढाणा, २९ मार्च (गुड इव्हिनिंग सिटी / रणजीतसिंग राजपूत) : लोकवर्गणीतून २०१९ ची विधानसभा निवडणूक लढविणारे आमदार संजय गायकवाड आता ५.५५ कोटी रुपयांचे मालक आहेत. अर्थात यातील मोठा वाटा त्यांना वडीलोपार्जीत वारसा हक्काने मिळालेली शेती आणि त्या शेतीत करण्यात आलेल्या प्लॉटिंगची बाजारभावानुसार किंमत १ कोटी २३ लाख रूपये आहे. तसेच त्यांना आमदार म्हणून दरमहा मिळणारे १ लाख ८६ हजार रुपयांचे वेतनामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येते. याशिवाय शेती हे उत्पन्नाचे साधन असल्याचे आ. गायकवाड यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे त्यांचे मोठे सुपुत्र मृत्यूंजय गायकवाड यांची संपत्ती एकुण १ कोटी ११ लाख ६१ हजार १०४ रुपये आहे. त्यांचाही व्यवसाय शेती असल्याचे नमूद करण्यात आले आहे. २०१९ मध्ये आ. गायकवाड यांची संपत्ती १ कोटी ६३ लाख रुपये होती आणि त्यांच्यावर ३९ लाख रुपयांचे कर्ज होते. हजारो कोटी रूपयांची विकासकामे बुलढाणा मतदारसंघात आणणारे आ. गायकवाड केवळ साडे पाच कोटींचेच मालक कसे? असा प्रश्न कुणालाही पडू शकेल. परंतु ‘मी कुठलेही कमिशन घेत नाही.. मला काम दर्जेदार लागेल.. तसेच मी कार्यकर्त्यांना कामे देतो मग कुणाकडून अपेक्षा का करू !’, त्यांच्या या भूमिकेवरून त्यांची संपत्ती एव्हढीच कशी, याचा अंदाज आला असेल. २०१४ मध्ये जेव्हा त्यांनी मनसेकडून उमेदवारी दाखल केली होती तेव्हा त्यांच्याकडे केवळ १५ लाख रुपयांची संपत्ती होती. त्यातही १४ लाख रुपयांचे बुलढाणा अर्बनचे कर्ज होते. आज रोजी त्यांच्यावर २१ लाख रुपयांचे वाहन कर्ज आहे. आ. गायकवाड यांनी काल, गुरुवार २८ मार्च रोजी लोक सभेसाठी शिवसेना पक्ष लिहीत अपक्ष उमेदवारीचे नामांकन दाखल केले. त्यावेळी अर्जासोबत नियमाप्रमाणे एक शपथपत्रही दिले आहे. त्या शपथपत्रात चल, अचल संपत्तीचे सविस्तार वर्णन तसेच गुन्हे, शिक्षण, इन्कम टॅक्स विवरण अशासंदर्भात माहिती देणे अनिवार्य असते. आ. संजय गायकवाड यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणूकीच्या वेळीही शपथपत्र दाखल केले होते. पाच वर्षांपूर्वी आणि कालच्या शपथपत्राची तुलना केली असता, त्यांच्या संपत्तीत तिपटीपेक्षा अधिक वाढ झालेली दिसत आहे. गुन्ह्यांच्या बाबतीत ५७ वर्षीय आ. गायकवाड यांच्यावर बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. एक प्रकरण २०१२ आणि दूसरे २०१७ मधील असल्याचे त्यांनी शपथपत्रात दिले आहे. न्यायालयात सुरु असलेल्या या दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांच्यावर दंगा करणे, हत्यार घेवून दंगा करणे, खून करण्याचा प्रयत्न करणे, विना परवानगी हत्यार वापरणे असे गुन्हे दाखल आहेत. गुड इव्हिनिंग सिटीने यापूर्वीही इतर उमेदवारांच्या संपत्तीचे विवरण प्रकाशित केलेले आहे. त्यांच्याकडे रोख स्वरुपात केवळ ३० हजार रुपये रक्कम आहे तर पत्नी सौ. पूजाताई यांच्याकडे नगदी दहा हजार तर दोन्ही मुले मृत्यूंजय आणि पृथ्वीराज यांच्याकडे प्रत्येकी पाच-पाच हजार रुपये आहेत. आ. संजय गायकवाड यांचे बुलढाणा आयसीआयसीआय बँकेत बचत खाते असून या खात्यात त्यांचे ८१ लाख १५ हजार ६२७ रुपये जमा आहेत. तर याच बँकेत पूजाताई यांचे ४२ लाख ७४ हजार ४९९ रुपये जमा आहेत. मृत्यूंजय आणि पृथ्वीराज दोघांचेही आयसीआयसीआय बँकेत खाते आहेत. त्यात मृत्यूंजय यांच्याकडे ८४ हजार ३०४ रुपये तर पृथ्वीराज यांच्या खात्यात केवळ ३४५ रुपये आहेत. एसबीआय बुलढाणा येथील शाखेत आ. गायकवाड यांचे १ लाख ३ हजार ३०८ रुपये जमा आहेत. तर सेंट्रल बँक ऑफ इंडीया बुलढाणा येथे त्यांच्या खात्यात ९०३६ रुपये आहेत. चिखली अर्बनमध्ये १४ हजार रुपये जमा आहेत. २०१९ मध्ये आ. गायकवाड यांच्याकडे केवळ एकच वाहन होते. अॅम्बेसेडरचा उल्लेख त्यांनी केला होता. आता त्यांच्याकडे फॉरच्युनर (एमएच २८ व्ही ३१३२) किंमत ४१ लाख रुपये आणि इन्होव्हा (एमएच २८ बीजे ३१३२) किंमत ३१ लाख ५ हजार ५२५ रुपये, असे दोन चारचाकी आहेत. विशेष म्हणजे त्यांचे चिरंजीव मृत्यूंजय यांच्याकडेही घाटाखाली १६ एकर शेती शेतजमीन, प्लॉट, निवासी इमारत तसेच फ्लॅट याबाबतीत त्यांनी शपथपत्रात दिलेल्या विवरणानुसार बुलडाणा गट क्र. ४४/०३ मधील प्लॉट १ ते २१ एकुण ३८ हजार ३ स्क्वेअर फूट वारसा हक्काने मिळालेली जमीन अदमासे बाजार मूल्य १ कोटी २३ लाख १८ हजार ७१० रूपये इतके आहे. ही शेतजमीन त्यांची वडीलोपार्जित आहे. त्यांनी राजूर शिवारात शेती घेतलेली आहे. राजूरच्या गट नं ६१ मध्ये आ. संजय गायकवाड आणि मृत्यूंजय यांची वेगवेगळी प्रत्येकी २ एकर ११ गुंठे शेती आहे. राजूरच्या गट नं. ६२ मध्ये पूजाताईची ३ एकर एक गुंठा आणि मृत्यूंजय यांची २ एकर ५ गुंठे जमीन आहे. गट नं. ६६ मध्ये आ. गायकवाड यांनी २ एकर १० गुंठे जमीन घेतलेली आहे. तर पृथ्वीराज यांच्याकडे वाघजाळ गट नं. ९६ मध्ये २ एकर ४० गुंठे शेती आहे. राजूर गट नं. ६७ मध्ये मृत्यूंजय गायकवाड यांच्या नावावर २ एकर ४१ गुंठे जमीन आहे. सन २०२० ते २०२२ या काळात घेतलेल्या या शेतजमीनींची किंमत आजच्या बाजारभावानुसार एकत्रीत मिळून गायकवाड कुटूंबाकडे ३ कोटी २० लाख ३४ हजार ७१० रुपये किंमतीची शेतजमीन आणि प्लॉट आहेत. मोताळ्यातील त्यांच्या फार्म हाऊसचा मात्र शपथपत्रात उल्लेख आढळला नाही. फॉरच्युनर (एमएच २८ बीजी ३१३२) किंमत ३१ लाख ८१ हजार रुपये ही गाडी आहे. चल संपत्तीमध्ये काही आभूषणांचा समावेश होतो. आ. गायकवाड यांच्याकडे १६ ग्रॅम वजनाचा एक लाख रुपयांचा सोनाच्या गोफ आणि जवळपास पाऊणे ३ लाख रुपयांचे ४१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे रूद्राक्षवाले ब्रासलेट आहे. कॅश, सेव्हींग अकाऊंट, चारचाकी वाहने आणि आभूषणांची आ. संजय गायकवाड यांच्या कुटूंबाकडे एकुण संपत्ती २ कोटी ३४ लाख ६७ हजार ९१४ रुपये आहे. गुड इव्हिनिंग सिटीला प्राप्त शपथपत्रानुसार आमदार झाले तरी संजय गायकवाड यांच्यावरील कर्ज फिटलेले आहे. वाहनासाठी आ. गायकवाड यांनी आयसीआयसीआय बँकेतून २१ लाख रुपये कर्ज घेतलेले आहे. तर पृथ्वीराज गायकवाड यांनीही वाहनासाठी याच बँकेतून ४ लाख ६१ हजार रुपयांचे कर्ज उचलले आहे. आ. गायकवाड यांचे शिक्षण शिवाजी हायस्कूल बुलढाणा येथून ९ वी पर्यंत झालेले आहेत. त्यांची बॅच १९८२ ची आहे.