8टाकरखेड हेलगाच्या आरोपी झनकलाल चिंचोलेने 2014 मध्ये बसचालकाला तर 2018 मध्ये ग्रामसेवकाला ठोकले होते !
बुलढाणा, 2 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) ः असे खूप दुर्मिळ उदाहरण असते की, एकच आरोपी झनकलाल चिंचोले याला, दोन वेगवेगळी प्रकरणे (2014 आणि 2018) आणि दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या शिक्षा मिळाव्या.. विशेष म्हणजे हे दोन्ही प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमुख यांच्या कोर्टात चालले. दोन्ही प्रकरणांमध्ये कलम 353 दाखल करण्यात आले होते. त्यांनी एकाच दिवशी दोन्ही प्रकरणांमध्ये निकाल दिला. सरकारी पक्ष ठेवणारे सरकारी वकील मात्र वेगवेगळे होते. एका प्रकरणात विशेष सरकारी वकील अॅड. सोनाली सावजी देशपांडे यांनी काम पाहिले तर दूसर्या प्रकरणात सहा. सरकारी वकील एस. पी. हिवाळे यांनी सरकारी पक्ष ठेवला.
टाकरखेड हेलगा येथील आरोपी झनकलाल शिवाजी चिंचोले (वय ) याचे पहिले प्रकरण 2014 मधील आहे. 10 ऑगस्ट 2014 रोजी त्याने टाकरखेड बसस्टॅापवर राडा केला होता. मद्यधुंद अवस्थेत त्याने बुलढाणा ते उंद्री बसचे कंडक्टर नारायण पुंडलीक सावळे यांना मारहाण केली होती. दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास आरोपी झनकलाल उंद्रीवरून बुलढाण्याकडे जाणार्या या बसच्या जवळ आला आणि कंडक्टर सावळे यांना ‘मला बुलढाणाला जायचे आहे’, असे बोलला. कंडक्टर सावळेंनी झनकलालसाठी बस थांबविली पण तो बसमध्ये चढायचे नांव घेत नव्हता. यावर कंडक्टरने झनकलालला ‘लवकर चला’, एव्हढेच म्हटले तर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या झनकलालने कंडक्टर सावळे यांना अश्लिल शिवीगाळ करीत हाता दगड घेवून डाव्या डोळ्यावरती मारून जखमी केले. लोकांनी झनकलालला आवरले. म्हणून कंडक्टर बचावले. याप्रकरणात कंडक्टर यांच्या तक्रारीवरून संबंधित अमडापूर पोलिस ठाण्यात आरोपी झनकलाल विरोधात कलम 353, 323 व 294 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणत बुलढाणा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील सी. खटी यांच्या न्यायलयात वर्ग करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे एकुण 5 साक्षीदारांचे पुरावे नोंदविण्यात आले. फिर्यादी कंडक्टर स्वतः, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सखाराम ओंकार वानखेडे, मेडीकल ऑफिसर डॉ. सुषमाताई हेलगे व तपास अधिकारी शालीग्राम काळे यांच्या साक्ष एकमेकांना पूरक व सुसंगत ठरल्या. तर फिर्यादी पक्षातर्फे अॅड. सोनाली सावजी देशपांडे यांनी योग्य प्रकारे प्रकरणाची सांगड घालून जोरदार युक्तीवाद केला. या सर्वांच्या आधारावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री खटी यांनी आरोपी झनकलाल यास दोषी ठरवित कलम 353 व 332 करीता प्रत्येकी दोन वर्षे कारावास, कलम 294 अंतर्गत दोन महिने सश्रम कारावास व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस सश्रम कारावास अशा प्रकारची शिक्षा काल, सोमवार 1 एप्रिल रोजी सुनावली. हेकाँ शांताराम जाधव यांनी कोर्ट पैरवी म्हणून प्रकरणात सहकार्य केले.
2014 मध्ये बस कंडक्टरला ठोकणार्या झनकलालने चार वर्षांनंतर म्हणजे 2018 मध्ये ग्रामसेवकाला मारहाण केली. 16 ऑक्टोबर 2018 रोजी टाकरखेड हेलगाचे ग्रामसेवक बाळकृष्ण रामप्रसाद खत्री कार्यालयात असतांना सकाळी 11 वाजेच्या सुमारास झनकलाल चिंचोले त्याठिकाणी आला व त्याने ग्रामसेवक खत्री यांना, ‘माझ्या शोचालयाचे कामाबाबत काय झाले?’, असा प्रश्न केला. त्यावर ग्रामसेवकांनी पुढच्या यादीत तुमचे शौचालय मंजूर होवून तुम्हाला लाभ देता येईल, असे समजाविले. यावर झनकलालने ग्रामसेवक खत्रीच्या गालावर चापटा मारत अश्लिल शिवीगाळ केली. चापटा इतक्या जोराने मारल्या की, खत्रीचा गाल सुजून बोटांची वळे उमटली होती. त्याठिकाणी उपस्थित कर्मचारी भानुदास कदम आणि गजानन रिंढे या दोघांनी झनकलालला आवरले. आरोपी एव्हढ्यावरच थांबला नाही. त्याने मागणी रजिस्टर नमुना 9 मध्ये फाडतोड करून शासकीय कामात अडथळा आणला. अमडापूर पोलिस स्टेशनमध्ये ग्रामसेवक खत्री यांच्या रिपोर्टवरून झनकलाल विरोधात कलम 353, 332, 294, 504, 506 भादंविनुसार तसेच सहकलम 3 सार्वजनिक संपत्ती विरूपण कायदा 1984 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. न्यायालयात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील सी. खटी यांच्या न्यायालयात सुरु झालेल्या या प्रकरणात फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी, डॉक्टर, तपास अधिकारी अशांची साक्ष झाली. सहा. सरकारी वकील अॅड. एस.पी. हिवाळे यांनी योग्य व कायदेशीरपणे सरकारी पक्षाच्या वतीने युक्तीवाद केला. पुरावे, साक्ष तसेच युक्तीवादाला ग्राह्य धरीत न्यायाधीश श्री खटी यांनी आरोपी झनकलाल चिंचोले यांना 1 एप्रिल 2024 रोजी झनकलालला दोषी मानत शिक्षा ठोठावली. कलम 353, 335 मध्ये प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजूरी व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिन्याची सक्त मजूरीची शिक्षा. तसेच कलम 3 सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदानुसार 2 वर्षांची सक्तमजूरीची शिक्षा तसेच एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जर दंड भरला नाही तर दोन महिने सक्तमजूरी.. कलम 294 नुसार दोन महिने सक्तमजूरी व 500 रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस सक्तमजूरी, तसेच कलम 504 नुसार 6 महिने सक्तमजूरी व एक हजार रुपए दंड, दंड न भरल्यास एक महिना सक्तमजूरी, कलम 506 नुसार 6 महिने सक्तमजूरीची शिक्षा व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. सदरच्या शिक्षा आरोपीने एकाचवेळी भोगायच्या असल्याने न्यायालयाने कलम 4 नुसार प्रोबेशन ऑफ अफेंडर कायद्यानुसार आरोपीला फायदा देवून त्याला त्याचे वर्तणूक सुधारण्याची संधी दिली. व 25 हजार रुपयांचे बाँड हमीपत्र म्हणून दोन वर्षांसाठी देण्यात यावा असे सुद्धा आदेशात निर्देशीत केले आहे. जर दोन वर्षांचे कालावधीत आरोपीने शांततेचा व वर्तणुकीचा भंग केल्यास आरोपीचा बाँड रद्द होवून त्याला शिक्षा भोगावी लागेल असा निकाल दिला आहे. हेकाँ शांताराम जाधव यांनीच कोर्ट पैरवी म्हणून याही प्रकरणात सहकार्य केले.