बुलडाणा, 29 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) : मृत्युची जशी तारीख आणि वेळ कुणालाच सांगता येत नाही तसे मृत्यूचे ठिकाणही कुणालाच माहित नसते. महाराष्ट्रापासून शेकडो किलोमिटर अंतरावर असलेल्या पश्चिम बंगालमधील एका कामगाराचा चिखलीजवळील बेराळ्यात खून झाला होता. याप्रकरणी न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. खून करणारे हसमुख आणि मुन्नाभाई सुद्धा बाहेर राज्याचेच आहेत, हे विशेष.
प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, मोहम्मद हुसेन मोहम्मद नुरयेजमल वय 34 वर्ष (रा. बोन्हा बिरभुम,पश्चिम बंगाल ) हा दिनांक 2 जुन 2022 पासून ‘जस्ट किचन कंपनी’ बेराळा येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. सदरहू कंपनीमध्ये कामगार लोकांसाठी भोजन बनवून भोजनाचे डब्बे संपुर्ण जिल्ह्यामध्ये पोहचविण्यात येतात. याच कंपनीमध्ये आरोपी क्रमांक1 हसमुख उर्फ मोहम्मद इम्दादुल लष्कर वय 32 वर्ष रा. लिलबगान (आसाम) हा मुकरदम म्हणुन तर आरोपी कमांक 2 मुन्नाभाई उर्फ मो. मुजम्मील शेख आबीद हुसेन वय 35 वर्ष राहणार झेंडापूर जिल्हा भागलपूर हा सुपरवायझर म्हणुन कार्यरत होता. दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 9.00 वाजेच्या सुमारास सफाई कामगार मृतक मो. हुसेन हा दारू पिवून गेटवर आल्याने त्याला कामावर घ्यायचे अथवा नाही याबाबत गेटवरील वॉचमन यांनी हसमुख आणि मुन्नाभाई यांना विचारणा केली असता त्यांनी मृतक यास कामावर घेण्यास नकार दिला. त्यावेळी मृतक व आरोपी यांच्यामध्ये कामावर न घेण्याच्या कारणावरून बोलचाल झाली होती. तद्नंतर रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यान मृतक मो. हुसेन वॉचमन यांची नजर चुकवून कंपनीच्या किचन हॉलमध्ये गेला असता त्याचे मागोमाग आरोपी हसमुख हा देखील त्याठिकाणी गेला. त्यावेळी त्यांचेमध्ये परत कामावर न घेण्याच्या कारणावरून वाद झाला व हसमुख याने मृतक यांस सिमेंटच्या पाय-यावरून भांडे धुण्याच्या मशिनपर्यंत ओढत नेवून फावडयाने त्याचे डोक्यात वार केला व तद्नंतर परत दिनांक 16 ऑगस्ट 2022 च्या सकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान दोन्हीही आरोपींनी पुन्हा याच कारणावरून कंपनीच्या गेटसमोर मृतक मो. हुसेन गास चापटा बुक्क्यांनी मारहाण करून त्याचे दोन्ही पाय घरून ओढले व हसमुखने स्टीलचे रॉडने त्याचे डोक्यात वार करून दोघांनीही मृतक यास जिवानिशी ठार मारले. सदर गुन्हयाची फिर्याद कंपनीचे वॉवमन सुखदेव नरसिंग साळोख यांनी दिनांक दूसर्या दिवशी 16 ऑगस्ट 2022 रोजी चिखली पोलीस स्टेशनला दाखल केली होती. त्याआधारे दोन्ही आरोपींविरूध्द भादंविचे कलम 302, 34 अन्वये अपराध कमांक 684/2022 नोंदविण्यात येवून सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरिक्षक राजेश चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान सगळया गोष्टींची पुर्तता झाल्यानंतर संबंधीत तपास अधिकारी यांनी दोषारोप पत्र विद्यमान न्यायालयात दाखल केले.
सदरचा खटला चालविण्याकरिता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बुलढाणा स्वप्नील खटी यांचे न्यायालयात वर्ग करण्यात आला. सदर प्रकरणात अभियोग पक्षातर्फे एकुण 8 साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदविण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वॉचमन सुखदेव नरसिंग साळोख, वॉचमन दिपक लालसिंग पवार, पंच शेख अज शेख रशिद पटेल, सुनिल प्रकाश पाटील, कामगार सित। ललीतरॉय, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गायकवाड, वैद्यकिय अधिकारी ग्रामीण रूग्णालय चिखली डॉ. अमोल प्रतापसिंग राजपूत व तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक राजेश चव्हाण यांच्या साक्षी अतिशय महत्वपूर्ण एकमेकांना पुरक व एकमेकांशी सुसंगत असल्याकारणाने विश्वासार्ह ठरल्या. शिवाय मृतकाच्या संपूर्ण अंगावर आढळून आलेल्या जखमेच्या अनुषंगाने व शवविच्छेदन अहवालाच्या आधारे वैद्यकिय अधिकारी यांची साक्षदेखील अतिशय महत्वपूर्ण ठरली व या सगळया पुराव्याचे आधारे विदयमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बुलढाणा श्री. स्वप्नील चंद्रकांत खटी साहेब यांनी दोन्हीही आरोपींना मांदविचे कलम 302, 34 अन्वये दोषी ठरवून दोघांनाही जन्मठेप व प्रत्येकी रूपये 500 दंड अशाप्रकारची शिक्षा आज,29 एप्रिल रोजी सुनावली. सदर प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. सोनाली सावजी देशपांडे यांनी योग्य प्रकारे सांगड घालून सरकार पक्षाची बाजु भक्कमपणे वि. न्यायालयासमोर मांडली. तर पो.हे.कॉ. नंदाराम इंगळे, पो.स्टे. चिखली यांनी कोर्ट पैरवी म्हणून पुर्णपणे सहकार्य केले.