अतिशय गंभीर आरोप करीत सतीश पवार यांचा राजीनामा
बुलढाणा, 7 मे (गुड इव्हिनिंग सिटी / अजय काकडे) : वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी काल पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी फेसबुक या सोशल माध्यमावर फेसबुक लाईव्ह करत वरिष्ठ पातळीवरील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहे. सतीश पवार यांनी म्हटले आहे की, मला पक्षात काही लोकांनी जाणूनबुजून डावले यामध्ये काही पदाधिकाऱ्यांचा समावेश मी कुणाचं नाव घेणार नाही पण मी माझ्या इच्छेनुसार राजीनामा दिला. लोकसभेच्या निवडणुक कालावधी दरम्यान ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांना काही वरीष्ठ पदाधिकारी हे भेटून दिशाभूल करतात, चुकीचे माहिती पोहोचवतात. जे उमेदवार कधी निवडून येऊ शकले नाही, त्यांचं काही वजन नाही अशा लोकांना पुढे केले जाते. ज्या लोकांचा इतिहास बघितला तर निवडणुकीत पराभवचा इतिहास राहिला आहे. जे कधी ग्रामपंचायतची निवडणूक जिंकले नाहीत अशा लोकांना समोर केलं जातं. तसेच उमेदवारीसाठी वरिष्ठ पातळीवर सेटलमेंट केल्या जाते. पदाधिकाऱ्यांना डावलने, त्यांचा वापर करून घेण्याचे काम केले जाते. पदाधिकाऱ्यांमध्ये चांगल्या प्रकारे नेतृत्व घडविणे ऐवजी त्यांना दलाल म्हणून तयार केल्या जाते. पदाधिकार्यांना लाचार व हातबल केलं जातं असल्यामुळे मी या सर्व गोष्टी बघून व्यथित झालो. बुलढाणा जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर सर्व लोकसभा मतदारसंघमध्ये सर्वच पक्षांनी बौद्ध समाजाला विचारात घेतलं नाही. काही लोकांची समज होती की बांधावरची लोक यांना आम्ही खांद्यावर कसे घेणार ? बौद्ध समाजाला हतबल, उपेक्षित ठेवण्याचं काम उमेदवाराने केल्याची मी स्वतः बघितलं. यापुढे समाजासाठी काम करण्याची संधी मला मिळेल. यापुढे सुद्धा समाजासाठी काही मोर्चे व आंदोलन करण्यासाठी मी तयार राहील. यापुढे समाजाच्या हितासाठी कुठल्याही वरिष्ठ नेत्यांचा आमच्यावर दबाव असणार नाही आणि आम्ही समाजासाठी निरंतर काम करत राहू मी यासाठी माझा वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्याकडून काल राजीनामा मंजूर सुध्दा झालेला आहे. १० मे रोजी आम्ही आमची पुढील भूमिका ठरवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे . अशा प्रकारे सतीश पवार यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंट वरून २२ तासापूर्वी फेसबुक लाईव्ह करत आपल्या मनातील खदखद 7 मिनिटे 39 सेकंदाच्या व्हिडिओ मध्ये व्यक्त केली आहे.