बुलढाणा, 3 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः चिखली तालुक्यातील एका गावात 45 वर्षीय शेख शकील रांगोळी विकण्याचे काम करतो. पण आपल्याच अल्पवयीन मुलीच्या आयुष्याला बेरंग करण्याचे काम या वासनांध पित्याने केले आहे. शेख शकीलने आपल्या 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला, नंतर तिला धमकी देवून चूपचापही केले होते. परंतु या नराधमाचे दुष्कृत्य मुलीला गर्भधारणा झाल्यामुळे उघड झाले आणि नंतर कायद्याने पिडीत मुलीला न्याय दिला. विशेष सत्र न्यायाधीश आर.एन.मेहरे यांनी आरोपी शेख शकीलला पोस्को कायद्यातील कलम 6 नुसार मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. सोबतच 3 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सदर आदेशात अंतर्भूत आहे.
कधी मजूरी तर कधी रांगोळी विकून घर चालविणारा शेख शकील वळतीमध्ये राहतो. त्याला एक 16 वर्षाची मुलगी आहे. तिने दहावी पूर्ण केली होती. डिसेंबर 2022 मध्ये मुलीची आई नातेवाईकांकडे गेली होती. घरी फक्त शकील आणि मुलगीच होते. शकील त्या रात्री ‘बाप’ नाही तर ‘साप’?झाला होता. बाहेरून दारू पिवून घरी आलेल्या शकीलच्या मनाचा वासनेने ताबा घेतला होता. त्याने मुलीला जबर्दस्तीने जवळ ओढले आणि बलात्कार केला. तीन महिन्यानंतर, मार्च 2023 मध्ये पिडीत मुलीच्या पोटात दुखू लागले. पिडीतेला घेवून तिच्या आईने चिखली येथील डॉ. शिंदे यांच्या हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी गोळ्या देवून घरी पाठविले. परंतु पोट दुखायचे थांबले नसल्यामुळे पुन्हा दूसर्या दिवशी पिडीत मुलीला घेवून आईने हॉस्पीटल गाठले. तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आले की, पिडीत मुलगी गर्भवती आहे. त्यानंतर खरा प्रकार समोर आला.
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला !
‘अब्बा’नेच आयुष्याला धब्बा लावला असल्याचे स्पष्ट होते. ‘फक्त उपचार करा, घरचे प्रकरण आहे आम्ही घरी निपटू’ असे डॉक्टरांना सांगण्यात आले. परंतु डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्यामुळे चिखली पोलिसांना कळविले. पिडीत मुलीला बुलढाणा येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. सदर प्रकरण कायद्याच्या कक्षेतील असल्यामुळे चिखली ठाण्याचे एपीआय प्रविण तळे यांनी काही सहकार्यांना सोबत घेवून साध्या वेषात जावून पिडीत मुलगी आणि तिच्या आईची भेट घेतली. परंतु आईने पोलिसांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. ‘आम्हांला कुणाविरोधातही तक्रार करायची नाही, आमच्यावर दबाव आणाल तर आम्ही मुलीचा उपचार करणार नाही, तिला मरू देवू’, अशी भूमिका शकीलच्या कुटूंबाने घेतली. कुटूंबियांकडूनच प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सूरू असल्यामुळे चिखली पोलिस ठाण्याचे एपीआय तळे यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात बलात्काराची तक्रार नोंदविली. तपास एपीआय सविता मोरे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्याच दिवशी, 20 मार्च 2023 रोजी या नराधम बापाला अटक करण्यात आली.
विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री यांचा प्रबळ युक्तीवाद
तत्कालिन बुलढाणा डीवायएसपी सचिन कदम यांनी एपीआय प्रियंका गोरे यांना पिडीत मुलीचा ‘इन कॅमेरा’ जबाब नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानंतर एपीआय गोरे यांनी इन कॅमेरा जबाब घेतला. यावेळी हेकाँ झगरे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. प्रकरणाचा तपास करून पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. प्रकरणात एकुण 14 साक्षीदार तपासण्यात आले. विशेष म्हणजे गर्भपात केलेले बाळ, पिडीता आणि आरोपी शेख शकीलचे डिएनए तपासण्यात आले. फॉरेन्सीक लॅबकडून प्राप्त रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले की, बाळाची आई पिडीता असून पिडीतेचे वडीलच म्हणजे शकीलच त्या बाळाचे ‘बायोलॉजिकल फादर’ आहे. अॅड. खत्री यांनी प्रबळ युक्तीवाद केला. आरोपी पक्षाच्या वकीलांनी पोस्कोच्या अनुषंगाने पिडीतेच्या जन्मनोंदणीबाबत आक्षेप घेतला होता. पुराव्या कायद्याच्या कलम 165 नुसार न्यायालयाने संबंधीत ग्रामविकास अधिकारी यांना न्यायालयाचा साक्षीदार म्हणून पाचारण केले. संबंधित ग्रामपंचायतने पिडीता ही 16 वर्षाची असल्याचे प्रमाणपत्र सादर केले.
उपलब्ध तांत्रिक पुरावे, नोंदविलेल्या साक्षी आणि अॅड. संतोष खत्री यांनी जोरदारपणे मांडलेली सरकारी बाजू महत्वाची ठरली. आज, बुधवार, 3 जुलै रोजी प्रकरणाचा निकाल लागला. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. मेहरे यांनी पोक्सोच्या कलम 6 नुसार शेख शकीलला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सोबत 3 हजार रूपये दंड केला. दंड न भरल्यास तीन महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. कोर्ट पैरवीत पोलिस नंदाराम इंगळे यांनी सहकार्य केले.
न्यायालयाने निकालाचे वाचन करतांना नमूद केलेले वाक्य प्रत्येक बापाला आत्मचिंतन करायला लावणारे आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, ‘बाहेरच्या विकृतींपासून रक्षण करणारा बाप असतो.. मुलीसाठी बाप हा एकमेव आधार असतो, मुली बाहेर सुरक्षित नाहीत, असे आपण म्हणतो. परंतु जर बाप नावाचा रक्षकच भक्षक बनत असेल तर मुली घरी पण असुरिक्षत आहे, हे गंभीर आहे.’
अॅड. संतोष खत्री यांची हॅटट्रीक
मागील एका महिन्यात विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री यांनी उल्लेखनीय कामगिरीची हॅटट्रीक केली आहे. 30 मे रोजी मावसबहिणीवर अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी रणजीत पारवेला 10 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. दूसरे प्रकरण, वहिनीचा खून करणार्या राजु गवईचे होते. या प्रकरणाचा निकाल 24 जून रोजी लागला. राजु गवईला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. पोटच्या मुलीवर बलात्कार करणार्या आरोपी शेख शकीलला जन्मठेपेची शिक्षा, हे तिसरे प्रकरण आजचे आहे. या तिनही प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. संतोष खत्री यांनी प्रबळ युक्तीवाद करीत महत्वाचे योगदान दिल्यामुळे आरोपींना शिक्षा होवू शकली.