बीबी येथील भाविकांना विषबाधा प्रकरण भोवले.
बुलढाणा, 4 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : मागील फेब्रुवारी महिन्यात बीबी येथे घडलेल्या भाविकांना प्रसादातून विषबाधा प्रकरणात रुग्णांच्या हेळसांडीचा फटका सीएस डॉ. चव्हाण यांना बसला आहे. बीबीमध्ये 600 पेक्षा अधिक भाविकांना प्रसादातून विषबाधा झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून याप्रकरणाची दखल घेतल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष मारुतीराव चव्हाण यांना राज्य शासनाने निलंबनाचा प्रसाद दिला आहे. त्यांच्या जागी जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा पदभार डॉक्टर भागवत भुसारी यांना सोपविण्यात आला आहे. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून थोड्या वेळापूर्वी आदेश प्राप्त झाले आहेत. गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार लोणार तालुक्यातील खापरखेड, सोमठाणा येथे येथे सप्हातानिमित्त करण्यात आलेल्या भगर, आमटीच्या प्रसादातून सुमारे ४०० जणांना विषबाधा झाल्याची घटना 20 फेब्रुवारी रोजी घडली होती. दरम्यान रुग्णांवर बिबी, लोणार आणि मेहकर येथील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले होते. तालुक्यातील सोमठाणा येथील भगवान नाडे यांच्या शेतातील मंदिरामध्ये 14 फेब्रुवारीपासून सप्ताह सुरू होता. सप्ताहाच्या सातव्या दिवशी एकादशी असल्याने भाविकांसाठी भगर, आमटीचा प्रसाद तयार करम्यात आला होता. मात्र हा प्रसाद खाल्ल्यामुळे सोमठाणा आणि खापरखेड येथील काही महिला व पुरुषांना त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना तातडीने बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरच उपलब्ध नसल्याने खासगी प्रॅक्टीस करण्यात आलेल्या डॉक्टरांना बोलावण्यात आले. रुग्णांची वाढती संख्या पहता रुग्णालयाच्या आवारातच ताडपत्री टाकून झाडाला दोरी बांधून रुग्णांना सलाईन देत उपचार सुरू करण्यात आले होते. दरम्यान सदर वृत्त संपूर्ण देशभरामध्ये गाजले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सदर घटनेची गंभीर दखल घेतली होती. बुलढाणा जिल्ह्यातील रूग्णांच्या दयनीय परिस्थितीबद्दल ॲमिकस क्युरी ( निष्पक्ष सल्लागार ) वकील मोहित खन्ना यांनी अनेक बातम्या सादर केल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठाने सरकारला सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश त्यावेळी दिले होते. याच प्रकरणाचा फटका डॉक्टर चव्हाण यांना बसला आहे. सदर घटनेमुळे आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली होती. उच्च न्यायालयाच्या संतापानंतर राज्य आरोग्य विभागाने डॉक्टर चव्हाण यांना निलंबित केले आहे. डॉक्टर चव्हाण यांच्या निलंबनाचे खरे कारण अनेकांना माहिती नव्हते. म्हणून गुड ईव्हीनिंग सिटीने आपल्या वाचकांपर्यंत सत्य पोहोचविण्यासाठी नेहमीप्रमाणे वस्तूनिष्ठ माहिती संकलित करून दिली आहे.