बुलढाण्यातील चैतन्यवाडीतील घटना
बुलढाणा, 10 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः येथील मच्छी ले-आऊटमध्ये बारावीत शिकत असलेल्या 17 वर्षीय जोहना तब्बसुमने गळफास घेवून आत्महत्या केली होती. या घटनेला 15 दिवसही उलटले नाही. आज चैतन्यवाडीमधील 16 वर्षीय कोमलने विहीरीत उडी मारून जीवन संपविले. जोहना आणि कोमल दोघांच्याही आत्महत्येमागे कारण एकच आहे.. अभ्यासाचा ताणतणाव ! शिरपूर येथील कोमल संदीप सुसर येथील एडेड विद्यालयात शिकत होती.तिचे वडील शेती करतात. पण मुलगी शिकावी म्हणून वडील आणि आई दोघेही चैतन्यवाडीत भाड्याच्या खोलीत राहत होते. आयसीआयसीआय बँकेच्या पाठीमागे श्री मुळे यांच्या खोलीत मागील अनेक दिवसांपासून कोमल आपल्या आई-वडीलांसह राहते. तिचा मोठा भाऊ संभाजीनगरला इंजिनीअरिंग करतो. कोमलने पवार सायन्स कोचिंग क्लासमध्ये ट्यूशनही लावली होती. ट्यूशनवाल्यांनी घेतलेल्या टेस्टमध्ये कोमलला कमी मार्क पडले. त्यावरून ट्यूशनवाल्यांनी तिच्या पालकांना कळविले आणि काल रात्री यावरून कोमलच्या आईवडीलांनी कोमलला रागावले. कोमलला हा राग सहन झाला नाही. आज पहाटे उठून तिने आई-वडील झोपलेले असतांना घरासमोरच असलेल्या विहीरीत उडी मारली. विहीरीला वरपर्यंत पाणी आहे. सकाळी 6 वाजेच्या सुमारास जेव्हा कोमलची आई उठली तेव्हा तिला मुलगी आढळून आली नाही. आजूबाजूला शोध?घेण्यात आला. गल्लीत असलेल्या इतर नातेवाईकांनाही कळविले. काही सिसिटीव्ही फूटेज पाहण्यात आले. परंतु कोमलचा कुठेच पत्ता नव्हता. कोमलची चप्पल मात्र दरवाजासमोरच होती. त्यानंतर विहीरीत शोध घेण्यात आला. एकाने विहीरीत उतरून शोधले. परंतु कोमल मिळून आली नाही. थोड्या वेळाने अग्निशमन वाहन बोलावून विहीरीत गळ टाकण्यात आला. त्या गळाला कोमलचा मृतदेह लागला. कोमलला हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. परंतु तिचा जीव गेलेला होता. नवतरूण मुलीने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने तिचे आई-वडील धाय मोकलून रडत आहेत. अनेक आई-वडील आपल्या पाल्यावर रागावतात. परंतु असे टोकाचे पाऊल उचलणे योग्य नव्हे, अशी चर्चा जनमानसांमध्ये आहे. कोमलच्या मृतदेहावर शिरपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कळते.