डॉक्टर नसून तपासणी करणार्या किसन गरड (कृष्णा पाटील) रंगेहाथ ताब्यात
बुलढाणा, 3 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी/ रणजीतसिंग राजपूत ) :- वैद्यकीय क्षेत्र आता सेवेचे राहिले नाही तर ‘धंदा’ झाला असल्याचे वारंवार समोर येत आहे. अवैधरित्या गर्भलिंग निदानाचे ‘कृष्णकृत्य’ करणार्या मेहकर येथील एका सोनोग्राफी सेंटरच्या मालकाला छापा मारून ताब्यात घेण्यात आले आहे. रेडिओलॉजिस्ट नसूनही गर्भलिंग तपासणी करतांना किसन गरडला (कृष्णा पाटील नावाने ओळखले जातात) एका भाड्याच्या खोलीतून रंगेहाथ पकडण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वातील आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या पुढाकाराने पीसीपीएनडीटीच्या पथकाने ही धाडसी आणि यशस्वी कारवाई केली आहे. आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास झालेल्या या कारवाईनंतर बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात, विशेष करून सोनोग्राफी सेंटर संचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मेहकर येथील सोनोग्राफी सेंटरवर छाप्याची ब्रेकींग न्यूज आपल्या सोशल मिडीयावर सर्वात प्रथम पोस्ट करणार्या गुड इव्हिनिंग सिटीला याबाबत माहिती मिळाली की, किसन गरड पाटील एक वैद्यकीय व्यवसायी आहेत. त्यांच्याकडे मेडीकल असून ते वैद्यकीय उपकरणे होलसेलमध्ये विकण्याचेही काम करतात. याशिवाय त्यांचे मेहकर येथील जिजाऊ चौकात स्थित वानखेडे कॉम्प्लेक्समध्ये निदान सोनोग्राफी सेंटर आहे. या सेंटरमध्ये दोन मशीन आहेत. रेडिओलॉजिस्ट नसले तरी किसन गरड यांना सोनोग्राफी सेंटरचा परवाना मिळालेला आहे. या सेेंटरला जरी त्याने आपल्या कृष्णकृत्यापासून दूर ठेवले असले तरी या सेंटरचा उपयोग त्याला ‘बकरे’ मिळण्यासाठी झाला. ‘मुलगा’ की ‘मुलगी’ हा आग्रह धरून बसणार्या दांपत्यांशी सौदा करायचा. त्यांना तिसर्या ठिकाणी घेवून जायचा आणि अवैधरित्या सोनोग्राफी करायचा. याबाबत काही गुप्त तक्रारी पीसीपीएनडीटी कायद्यासाठी काम करणार्या जिल्हास्तरीय समितीला प्राप्त झाल्या आहेत. परंतु त्यावर कुठलीच कारवाई मागच्या दिवसांत झाली नव्हती. डॉ. भागवत भुसारी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून नुकतेच रुजू झाले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या आदेशाने डॉ. भुसारी यांनी समितीला सूचित केले आणि आज सकाळपासून किसन गरडला रंगेहाथ पकडण्यासाठी योजना बनविण्यात आली.
गरडने पवनसूत नगरमध्ये भाड्याची खोली घेतलेली आहे. त्याठिकाणी दोन रूम आहेत. एक किचन आणि समोरचा हॉल. एक दांपत्याला त्याने दुपारी 1 वाजेच्या सुमारास गर्भलिंग तपासणीसाठी बोलाविले होते. मोठी रक्कम घेण्याच्या अटीवरच तो तपासणीसाठी तयार झाला होता. गर्भवती महिलेला आत घेवून तपासणी सुरु झाली. गरडकडे सोनोग्राफीची पोर्टेबल मशीन आहे. रेडिओलॉजिस्ट नसतांनाही गरडने गर्भलिंग तपासणीचे ज्ञान मिळविले. ‘मुलगा’ असल्याचे निदान झाल्यावर त्याने सदर दांपत्यास मशीनचा निष्कर्ष सांगितला. इकडे दबा धरून बसलेल्या पथकाने किसन गरडवर छापा मारला. त्याला ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे या पथकात पोलिसही होते. गरडसोबत आणखी कोण कोण या गर्भलिंग निदानाच्या या दुष्कृत्यामध्ये सहभागी आहे, याचा तपास सुरु आहे. पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गरडविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरु होती.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासणे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या विशेष प्रयत्नांमुळेच पथकाने ही धाडसी कारवाई केली. या पथकात सहभागी अॅड. छाया तायडे कायदेशीर बाजू सांभाळून आहे. तर पथकातील सायकॉलॉजिस्टइ ज्ञानेश्वर मुळे, मनोज जोशी, प्राधिकृत केलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. चव्हाण तसेच मेहकर शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार, सहाय्यक तथा पोलिस कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.