बुलढाणा, २८ ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींना गेल्या दोन महिन्यापासून विविध कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. त्यामुळे गोरगरीब बहिणींची तब्बल दोन महिन्यांची मजुरी बुडाली आहे. मध्यप्रदेशात तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लाडली बहना योजना सुरू केली. या योजनेमुळे त्यांना विधानसभेत तसेच लोकसभेत खूप फायदा झाला. या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्रातील विद्यमान सरकारने २८ जूनपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्धार केला. त्यानुसार प्रथम २१ ते ६० वर्षाच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार होता. परंतुत्यात बदल करून शासनानेया योजनेसाठी महिलांचे वय २१ ते ६५ असे केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर महिलेचा महाराष्ट्र राज्यात अधिवास असला पाहिजे. या योजनेत राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिलांचा समावेश केला जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहेतसेचलाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत मर्यादित असावे लागणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले बँक खाते आधार लिंक करण्यासाठी, उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी, रेशन कार्ड अध्यायावत करण्यासाठी व इतर अनेक प्रकारचे प्रमाणपत्र काढण्यासाठी गेल्या तब्बल दोन महिन्यापासून मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी, त्यांच्या सोबत भाचे, मेहुणे तसेच अन्य नातेवाईक दररोज शासकीय कार्यालयात खेटे घालीत आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांपैकी बहुसंख्या महिला हातावर पोट असलेल्या अत्यंत गरीब परिस्थितीतील आहेत. त्यांना उदरनिर्वाहासाठी दररोज मजुरी करणे अनिवार्य आहे. अशा मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या मजुरीपासून वंचित राहावे लागल्यामुळे त्यांना पंधराशे रुपये दरमहा मिळण्याच्या लालसेपोटी जवळपास दहा-पंधरा हजार रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे दैनंदिन मजुरी करून पैसे कमाविणाऱ्या महिलांवर भीक नको पण कुत्रे आवर, अशी वेळ आली आहे.