बुलढाणा, 3 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) :- जेमतेम 11 वर्षांची मुलगी.. आई जॉबनिमित्त मुंबईला गेलेली.. घरी मुलगी एकटीच.. रात्री उशीरा बाप घरी पोहोचतो आणि झोपी गेलेल्या मुलीचा झगा वर करून नको त्या ठिकाणी वाईट उद्देश्याने स्पर्श करतो.. कोणता बाप असे करेल ! बदनामीच्या भितीने म्हणून या घटनेकडे कुटूंब कानाडोळा करते पण विकृत मनोवृत्तीचा हा बाप पुढच्या दहा महिन्यात पुन्हा आपल्या मुलीला ‘तू माझ्याजवळ झोपायला ये’, असे म्हणतो, तेव्हा क्षमा अशा सापाला क्षमा कशी करायची.. आरोपी बापाविरोधात मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेतल्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयाने आज या प्रकरणात निर्णय देतांना स्वतःच्याच मुलीसोबत लैंगिक गैरवर्तन करणार्या या विकृत बापाला 5 वर्षांची शिक्षा ठोठावली असून सोबतच 5 हजाराचा दंडही सुनावला आहे. जिल्हा सरकारी वकील अॅड. वसंत एल. भटकर यांचा प्रबळ युक्तीवाद या बापाला त्याच्या पापाची शिक्षा मिळवून देण्यात प्रभावी ठरला.
यातील फिर्यादी ही आरोपीची (वय 38) पत्नी असून पिडीता ही स्वतःची मुलगी आहे. सदरची घटना ही मिलींदनगर बुलढाणा येथील असून घटना दिनांक 16 जुलै 2019 रोजी रात्री अंदाजे 8 वाजेच्या दरम्यान घडलेली आहे. त्यावेळेस पिडीता ही आरोपी अर्थात वडिलांच्या रूममध्ये लॅपटॉपवर सिनेमा पाहत असतांना तिला अचानक झोप लागली होती व ती पलंगावर झोपलेली असतांना रात्री उशिरा आरोपी घरी आल्यानंतर वाईट उद्देशाने नको त्या ठिकाणी हात ठेवला. त्यामुळे ती घाबरून जागी झाली. त्यामुळे आरोपी वडिल तेथून निघून गेले. त्यावेळी पिडीतेची आई अर्थात फिर्यादी मुंबई येथे जॉब करिता गेलेली असल्यामुळे सदरची घटना पिडीतेने मोठ्या काकूस सांगीतली होती व काही दिवसांनतर आई मुंबईवरून आल्यानंतर आईला सांगीतली होती. परंतु वडील असल्यामुळे बदनामी होवू नये म्हणुन पिडीतेने किंवा तिच्या आईने आरोपीविरूध्द तक्रार दाखल केली नव्हती.
त्यानंतर दिनांक 18 मे 2020 रोजी रात्री अंदाजे 1 वाजता ‘तुझी मम्मी माझेजवळ झोपत नाही तर तु माझ्याजवळ झोपायला ये’, असे वाईट उद्देशाने पिडीतेला म्हटले होते. त्यावरून फिर्यादी आई व आरोपीमध्ये भांडणे झाली होती. अशा परिस्थितीमध्ये आरोपीच्या सततच्या अशा वाईट कृत्यास कंटाळून फिर्यादी आईने वरील दोन्ही घटनेबद्दल पो.स्टे. बुलढाणा शहर येथे तकार दाखल केली होती. सदर तकारीवरून व झालेल्या तपासावरून आरोपीविरूध्द भादंवीचे कलम 354, 376 (2) (एफ), 376 (अ) (ब) व पोक्सो अॅक्ट चे कलम 4, 8. 12 नुसार दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.
दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर आरोपीविरूध्द गुन्हा सि होण्याच्या दृष्टीकोनातून अॅड. वसंत भटकर, जिल्हा सरकारी वकील यांनी एकुण सात साक्षीदार तपासले त्यामध्ये पिडीता, तिची आई अर्थात फिर्यादी, पिडीतेची मोठी काकू, घटनास्थळ पंच, वैद्यकिय अधिकारी व तपास अधिकारी हया सर्वांची साक्ष महत्वाची ठरली.
दिनांक 01 ऑक्टोबर 2024 रोजी आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होण्याच्या दृष्टीकोनातून अॅड. वसंत भटकर, जिल्हा सरकारी वकिल यांनी प्रभावी युक्तीवाद केला व आज दिनांक 03 ऑक्टोबर 2024 रोजी विद्यमान विशेष न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी भादंवीचे कलम 354 व पोक्सो अॅक्टचे कलम 8, 10 व 12 मध्ये आरोपीस दोषी ठरवून त्यास पाच वर्षाचा सश्रम कारावास व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास चार महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे व भादंवीचे कलम 376 मधून आरोपीस निर्दोष मुक्त केले आहे. तर पिडीतेला दंडाच्या रक्कमेपैकी रूपये 4 हजार 500 अर्थसहाय्य स्वरूपात देण्याचा आदेश विद्यमान न्यायालयाने केलेला आहे. याशिवाय अधिकचे अर्थ सहाय्य होण्याच्या दृष्टीकोनातून प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाकडे वर्ग करण्यात आलेले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पीएसआय विनीत घाटोळ यांनी केला तर कोर्ट पैरवी एएसआय किशोर कांबळे यांनी सहकार्य केले.