थंडीमुळे रात्री ९ नंतर कमालीचा शुकशुकाट
बुलढाणा, २९ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : : वातावरणात बदल झाला की, दवाखान्यात रुग्णांच्या रांगा लागल्याच म्हणून समजा. आता हिवाळ्याला सुरुवात होताच सरकारी रुग्णालयासह खाजगी दवाखानेही रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. अचानक वाढलेल्या गारठ्याने श्वशनविकाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. दमा, अस्थमाचे रुग्ण प्रत्येक रुग्णालयात आढळून येत आहेत. शिवाय साथीच्या आजारांनीही डोके वर काढले आहे. बदललेल्या वातावरणात योग्य ती काळजी घेणे हाच पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे मत येत आहे. पावसाळ्यात ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे कावीळच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. त्यानंतर आता हिवाळा ऋतुची सुरुवात कडाक्याच्या थंडीने झाली आहे. आठ दिवसांपूर्वी थंडीची चाहूल लागली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पहाटे गारठा आणि दिवसभर थंडी ही कायम आहे. परिणामी बाजारपेठेवरही या वातावरण बदलाचा परिणाम झाला आहे. सकाळी १० वाजेनंतरच नागरिक घराबाहेर पडत आहेत तर रात्री ९ नंतर कमालीचा शुकशुकाट जाणवत आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे श्वशनविकार संबंधित दमा, अस्थमा यासारख्या रुग्णांना अधिकचा त्रास होऊ लागला आहे. अशा रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार तर घ्यावाच शिवाय घराबाहेर न पडलेलेच बरं. या वातावरणातील बदलामुळे ताप, सर्दी आणि खोकला या साथीच्या आजारांमध्येही वाढ झालेली आहे. रुग्णांनी घरगुती उपचार किंवा औषध दुकानातून गोळ्या घेऊन तात्पुरता उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे हे गरजेचे आहे. दिवसभर थंडी असल्याने त्वचेच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. वाता- वरणातील बदलाचा परिणाम हा बालके आणि वयोवृद्धांवरच अधिक होतो. थंडीत वाढ झाल्याने दमा, अस्थमा असलेल्या रुग्णांना जास्तीचा त्रास होतो. त्यामुळे अशा रुग्णांनी शक्यतो घराबाहेरच पडू नये. शिवाय कोमट पाणी आणि तुळशीचा काढा घेतल्यास अधिक फायद्याचे होणार आहे.
काय आहे उपाययोजना ?
थंडीमध्ये उबदार कपडे वापरणे गरजेचे आहे. वाता- वरणातील बदलामुळे ताप, सर्दी, खोकला याची सुरुवात होताच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. दमा, अस्थमा असलेल्या रुग्णांनी शक्यतो घराबाहेरच पडू नये. कोमट पाणी पिल्यास साथीचे आजार होणार नाहीत.