◾ चांडोळ जवळील पासोडी गावाजवळची घटना
◾ माय – लेकीला वाचविण्यात यश
बुलढाणा, 22 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी ) : आजची सकाळ त्या मजुरांसाठी मृत्यूची सकाळ ठरली. पासोडा ते चांडोळ रस्त्यावर सुरू असलेल्या एका पुलाजवळ रेतीच्या टिप्पर मुळे पाच मजुरांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे 04:30 वाजे दरम्यानची ही घटना आहे. मजुरांच्या झोपडीवर रेतीचा टिप्पर खाली केल्याने रेतीखाली दबून मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतक मजूर संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यातील आहेत. चांडोळ मार्गावर पासोडी गावातील पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या जवळ तात्पुरती झोपडी करून मजूर राहत आहेत. याच कामासाठी आज सकाळी रेती घेऊन टिप्पर पोहोचले होते. अंधार असल्यामुळे टिप्पर चालकाने उंच भागावरून ज्या ठिकाणी रेती खाली केली. खाली मजूर झोपले असल्याचे त्याच्या लक्षात आले नव्हते. रेतीच्या प्रचंड ढिगार्याखाली सात जण अडकले. जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा काही जण मदतीसाठी धावले. केवळ एक महिला आणि एका मुलीला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. परंतु 5 मजूर मरण पावले होते. घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. गंभीर जखमी असलेल्या महिलेला आणि मुलीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे.