◾ तीन अग्निशमन वाहने लागली आग विझवण्यासाठी
बुलढाणा, 14 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : येथील मिर्झा नगरच्या शेवटच्या भागात डोंगराला लागून असलेल्या वस्तीत मध्यरात्रीनंतर आग लागली. आग एवढी भीषण होती की आगीने वस्तीतील पाच घरांना स्वाहा केले. एका ठिकाणाहून लागलेली ही आग हळूहळू इतर घरापर्यंत पोहोचली होती. दोन ते अडीच वाजेच्या सुमारास हा अग्नी तांडव सुरू झाला. आगीचे रुद्र रूप पाहता चिखली वरून सुद्धा अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले होते. बुलढाणा नगरपालिकेचे दोन अग्निशमन वाहन आणि चिखलीचे एक अशा तीन वाहनांनी तब्बल अडीच ते तीन तासापर्यंत शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर आगे वर नियंत्रण मिळवता आले. अन्यथा ही आग संपूर्ण वस्तीला भस्मसात करू शकली असती. सुदैवाने आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही परंतु घरेच्या घरे खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी जीवाची बाजी लावून आग विझवणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जळालेली घरे मजूर वर्गाची आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सामान्य जनतेमधून उठत आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे.