बुलढाणा जिल्हा तसा कोणत्या ही पक्षाचा गढ वैगेरे राहीलेला नाही. नाही म्हणायला एका ठिकाणी भाजप आणि एका ठिकाणी राष्ट्रवादी वगळता आजवर काँग्रेस, शिवसेना या दोन पक्षांनाच आळीपाळीने सत्ता मिळत राहीली. आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन शकले पडल्याने दोन्ही ठिकाणी बंडाने वेगळ्या झालेल्या पक्षाला मतदारांनी पसंती दिलेली आहे. काल- परवा महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाने त्यांचे जिल्हाप्रमुख घोषीत केले. सर्वच ठिकाणी आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना डोळयासमोर ठेवुन जातीपातीचे समतोल राखण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एकमात्र बुलढाण्यात याउलट परिस्थिती आहे. इथे जातीपातीचा विचार करुन जिल्हाप्रमुख देण्यात आलेला नाही. मग काय म्हणुन देण्यात आला असेल हा प्रश्न भाजपाचे कितीतरी वर्षापासुन इमानेइतबारे काम करणारेविचारु शकतात. कारण सध्याचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख यांचा संपुर्ण प्रवास शिवसेनेत गेला मात्र तिकीट वाटपाचे वेळी वंचितमधुन भाजप असा झालेला आहे. जुने जाणते सोडून विजयराज शिंदे यांच्यासारख्या नवख्या भाजपवासी झालेला व्यक्तीला जिल्हाप्रमुख करण्यामागे काय हेतु असु शकतो, याचा विचार केला असता काही बाबींवर प्रकाश टाकणे आवश्यक वाटते. मुळात हिदुंत्वावर चालणार्या शिवसेनेत गुरु-शिष्यांच्या जोडीमुळे घुसमट होत असल्याने विजयराज यांनी वंचितचे तिकीट घेवुन निवडणुक लढविली. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. पराभव झाला सर्व संपले, असा सगळयांचा समज झालेला असतांना विजयराज यांनी त्यांचे आमदारकीच्या काळात फडणवीसांसोबत झालेल्या मैत्रीला साक्षी धरुन भाजपामध्ये प्रवेश केला. शिर्ष नेत्यांसमवेत मंचावर बसणे व एखाद्या प्रश्नावर निवेदन देणे, या व्यतिरिक्त त्यांच्या वाट्याला फारसं काही आलं नाही. संपर्क प्रमुख म्हणुन नियुक्ती झाल्यावर मतदारसंघातील आपली पकड त्यांनी मजबुत करायला सुरुवात केली. स्थानिक आमदारांनी फडणवीस साहेबांच्या तोंडात कोरोना जंतु कोंबण्याची भाषा केल्यावर पक्षनेतृत्वावर केलेली टिका जिव्हारी लागुन विजयराज यांनी आंदोलन पुकारले. या आंदोलनात त्यांनाच टार्गेट करण्यात येवुन असंवैधानिक पध्दतीने आंदोलन चिरडुन टाकण्यात आले. मात्र पक्षनेतृत्वाच्या नजरेत येण्याची सुर्वणसंधी याच आंदोलनामुळे मिळाली असल्याचे मत पक्षातील कार्यकर्ते आज व्यक्त करत आहेत. तसेही विजयराज शिंदे यांनी स्वत:च्या समाजाचा एकगठ्ठा मतदार नसतांना केवळ पक्षाच्या आणि जनसंपर्काच्या जोरावर तीन टर्म आमदारकी मिळविलेली आहे. त्यामुळे त्यांची मतदारसंघात बर्यापैकी ओळख आहे. शिंदेसेनेचे वाढते प्रस्थ कमी करण्यासाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तुल्यबळ उमेदवार ठरविण्यासाठी विजयराज शिंदे यांची जिल्हाप्रमुख म्हणुन नियुक्ती करण्यात आल्याचे दिसते. तसे ही स्थानिक आमदार आणि विजयराज शिंदे यांचा राजकारणाचा प्रवास सोबत झाल्याने दोघांनाही एकमेकांचे कच्चे-पक्के दुवे माहित असावेत. वास्तविक विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीचे काम केले नाही म्हणुन थेट नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या कडे विजयराज यांची तक्रार करण्यात आल्याची बातमी होती.
तक्रारीमध्ये काही तथ्य आढळुन आले नसेल किंवा ज्यांनी तक्रार केली त्यांना शह देण्यासाठीच विजयराज यांची नियुक्ती जिल्हाप्रमुख म्हणुन तर केली नाही ना, अशी शंका येते. सध्या याच जिल्ह्यातील रहिवासी असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, शिवसेना उबाठाच्या प्रवक्त्या, दुसर्यांदा संधी मिळालेले आमदार आणि जिल्हाप्रमुख विजयराज शिंदे यांच्या मुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चुरशीच्या होतील यात तिळमात्र शंका नाही. पक्षनेतृत्वाने आदेश दिल्याने आमदार-खासदारकीचा फार्म भरणारे विजयराज शिंदे यांची तत्कालीन पालकमंत्र्यांनी औकात काढली होती तर स्थानिक आमदारांनी त्यांना “चिल्लर”म्हणुन संबोधले होते. भाजप जिल्हाप्रमुख विजयराज शिंदे हे “चिल्लर” आहे का “जायंट किलर” आहेत हे येणारा काळ सांगेलच तुर्तास सध्या मात्र विजयराज यांच्या मनात एक शेर नक्की येत असेल.. कहाँ गये वो मुझे मझधार मे छोडनेवाले, खबर कर दो उन्हे की साहील पे लौट आया हूं मै..