बुलढाणा, 17 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटीे) ः जालना जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील केंद्रनायक राजेंद्र पुंडलिक शेळके यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींकडून राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी हा सन्मान जाहीर होताच जिल्हा जालना, बुलढाणा आणि संपूर्ण होमगार्ड परिवारात आनंदाची लाट उसळली आहे. राजेंद्र शेळके यांनी पूरपीडितांचे प्राण वाचविणे, आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम राबविणे, तसेच होमगार्ड संघटनेतील निष्ठावान व शिस्तबद्ध सेवा या माध्यमातून आपले स्थान निर्माण केले आहे. यापूर्वीही केंद्र सरकारकडून त्यांना डिक्स मेडल प्रदान करण्यात आले होते. बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले शेळके यांनी बुलढाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांतील होमगार्ड कार्यालयात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. विशेष म्हणजे, आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील त्यांचे कौशल्य व तज्ञता राज्यभर गाजलेली आहे. पूर, आगीच्या घटना, अपघात अशा संकटाच्या क्षणी त्यांच्या तात्काळ आणि धाडसी प्रतिसादामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या या सन्मानाबद्दल जिल्हा प्रशासन, सहकारी कर्मचारी, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कौतुक केले. राजेंद्र शेळके हे केवळ होमगार्ड अधिकारी नाहीत, तर जनतेसाठी सदैव तत्पर असलेले खरे ’आपत्तीवीर’ आहेत, अशी भावना व्यक्त केली जात आहे.