‘वृत्तेश्वर’ गणेशोत्सव मंडळाची संकल्पना
बुलढाणा, 22 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) ः जिल्हा पत्रकार संघातर्फे बुलढाणा येथील पत्रकार भवन परिसरात पहिल्यांदाच पत्रकारांनी आयोजित केलेला गणेशोत्सव वैचारिक आणि प्रबोधनात्मक व्हावा, या अनुषंगाने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यानुसार, जिल्हा पोलीस दलाच्या सहकार्याने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वाढत्या व्यसनाधिनतेवर अंकुश लावण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने ‘मिशन परिवर्तन’ हे अभियान सुरू केले आहे. जिल्हाभरात हे अभियान प्रभावीपणे राबत असताना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर याला व्यापक रूप प्राप्त होण्यासाठी पत्रकार संघ आणि बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने वृत्तेश्वर गणेश मंडळातर्फे नशामुक्ती विषयावर आधारित निंबध स्पर्धा होणार आहे. यामध्ये, इयत्ता 8 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पहिले पारितोषिक तीन हजार रुपयांचे दिले जाणार आहे. द्वितीय दोन हजार आणि तृतीय पुरस्कार एक हजार असे दिले जाणार आहे. तसेच महाविद्यालयीन व खुल्या गटातील स्पर्धकांसाठी प्रथम पुरस्कार पाच हजार, द्वितीय तीन तर तृतीय दोन हजार रुपयांचा असेल. याशिवाय, विजेत्यांना सन्मानचिन्ह प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देखील मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे, व्यसनाधीनता : तरुणाईला लागलेली कीड, नशामुक्त भारत समाजासाठी उपाययोजना, व्यसनमुक्ती काळाची गरज, नशामुक्त भारत असे निंबधाचे विषय असणार आहेत. उपरोक्त विषयांपैकी कुठल्याही एका विषयावर किमान पाचशे शब्द मर्यादा असलेला व व स्वहस्ताक्षरात लिहिलेला निंबध सादर करावा. निंबधाच्या शेवटी एक घोषवाक्य लिहणे बंधनकारक राहील. बुलढाणा येथील पत्रकार भवनावर निंबध पोहोचविण्याची अंतिम मुदत 28 ऑगस्ट राहील. पुरस्कार वितरण 31 ऑगस्ट रोजी होईल. अधिकाधिक संख्येने स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पत्रकार संघाचे ब्रम्हानंद जाधव 9834490117, राजेश डिडोळकर 9422884608, डॉ. भागवत वसे 8788402250 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.